(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather Update : उत्तर भारतात ढगाळ वातावरण, तर 7 ते 9 मार्चदरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता
पुढच्या काही दिवसात उत्तर भारतात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 7 ते 9 मार्च, दरम्यान महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Weather Update : दिल्लीसह उत्तर भारतात सध्या तापमानात बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढच्या काही दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, दिल्लीत शनिवारी कमाल तापमान 27.02 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जे या हंगामासाठी सामान्य आहे. शहरातील किमान तापमान 13.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, ते हंगामाच्या सरासरीपेक्षा दोन अंशांनी कमी आहे. आज दिल्लीत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 7 ते 9 मार्च, दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान व प. मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
महराष्ट्रात देखील 7 ते 9 मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यात हरभरा, गहू काढणी चालू आहे. 7 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी हरभरा, गहू काढूण घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, दिल्लीतआर्द्रतेची पातळी 85 ते 47 टक्के इतकी नोंदवली गेली. आज शहरात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 28 आणि 13 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत दुपारी 4 वाजता शहरातील हवेची गुणवत्ता 'समाधानकारक' म्हणून नोंदवण्यात आली.
जम्मू आणि काश्मीर
शनिवारी पहाटे जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील पंथियालजवळील डोंगरावरून दगड कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर 270 किमी लांबीच्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची महिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून, मोक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या या महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
राजस्थान
सध्या वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे मार्चच्या मध्यापासून राज्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) भोपाळ कार्यालयातील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ जीडी मिश्रा यांनी गुरुवारी पीटीआयला सांगितले की, एप्रिल आणि मे महिन्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 15 मार्चपासून मध्य प्रदेशातील तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणार्या जागतिक मापदंडानुसार आणि आयएमडीच्या अभ्यासानुसार, यावर्षी अधिक उष्णतेची शक्यता आहे. या हंगामात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.
बिहार
बिहारमध्येही हवामान बदलत आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील हवामान कोरडे होते. त्याचबरोबर पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहिल्याने रात्रीच्या तापमानात विशेष बदल होणार नाही. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस नोंदविले जाऊ शकते.
उत्तराखंड
आज उत्तराखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान स्वच्छ राहणार असून, सूर्यप्रकाशही पडणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात आज किमान तापमान 4 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.