सिंधुदुर्ग : शिवसेना नेते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना पुन्हा झटका बसला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे. दरम्यान, याप्रकरणी आमच्यापुढे हायकोर्टात जाणे हा पर्याय आहे. आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. त्यामुळे हायकोर्टात जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत नितेश राणे पोलिसांसमोर हजर राहणार नसल्याची माहिती राणेंचे वकिल संग्राम देसाई यांनी दिली आहे.


जरी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असला तरी आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. आता न्यायालयाची वेळ संपली आहे. उद्या आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. उद्या आम्ही हायकोर्टात गेलो तरी सुनावणी होण्यास पुढील दोन तीन दिवस जाणार असल्याचे देसाई म्हणाले. त्यामुळे सुनावणी होईपर्यंत नितेश राणे पोलिसांपासून वेगळे राहू शकतात असे देसाई म्हणाले. आम्हाला तसा कायदेशीर अधिकार आहे. जर हायकोर्टात नाहीच गेलो तर कोर्टात हजर राहण्याचा पर्याय देखील आमच्यासमोर असल्याचे देसाई यांनी सांगितले. नितेश राणे यांच्याबद्दलची ऑर्डर कॉपी अद्याप आम्हाला मिळालेली नाही. मात्र, न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्याकडे असणारे मोबाईल जप्त करायचे आहेत, त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आमच्या बाजून पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत. गरज पडल्यास आणखी मदत करु असेही ते यावेळी म्हणाले. यापूर्वी नितेश राणे यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले होते असेही यावेळी देसाई यांनी सांगितले.


नितेश राणे यांचे वकील आणि सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली आहे. नितेश राणे यांनी शिवसैनिक संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आहे. मागील तीन दिवसांपासून नितेश राणे हे अज्ञातवासात असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  नितेश राणे यांना प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा दावा त्यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी कोर्टात केला. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि नितेश राणे यांचा काहीही संबंध नसल्याचेही अॅड. देसाई यांनी सांगितले. तर, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. नितेश राणे हे पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील घरत यांनी सांगितले. सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील यांच्यात खडाजंगी झाली. याप्रकणी सरकारी वकील हे वेळ काढण्याचे काम करत असल्याचा आरोप नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी केला आहे. दरम्यान, आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.