मुंबई :  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी प्लॅन तयार केले आहेत. मात्र, कोरोना निर्बंधामुळे न्यू इअर पार्टीवर मर्यादा आल्या आहेत. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईत 7  जानेवारीपर्यंत  जमावबंदी लागू असणार आहे. मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलेलं आहे. तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मुंबईत  हायअलर्ट जारी करण्यात आली आहे. 


मुंबई कायम दहशतवाद्याच्या निशाण्यावर असते. आता 31 डिसेंबरला दहशतवाद्यांकडून धोका असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली आहे. त्यामुळे मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.  तसेच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांच्या उद्या (31 डिसेंबर ) सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहे. 


सार्वजनिक मालमत्तादेखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकते. इंटेलिजन्स विभागाच्या सूचनेनंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. . सामान्य लोकांनी घाबरु नये तर सावधगिरी बाळगावी. घाबरून जाण्याची गरज नाही, प्रत्येकाने सावध राहा, असे आवाहन पोलीस उपायुक्त चैतन्य यांनी मुंबईकरांना केले आहे.


31 डिसेंबरला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  अँटी सॅबटॉजची टीम, BDDS, क्राईम ब्रान्चसह  लोकल पोलिस स्टेशनच्या ATC ला देखील अलर्ट देण्यात आला आहे.  राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ABP न्यूजशी केलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत सांगितले की, 31 डिसेंबरला मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मोठ्या पार्ट्यांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि कम्युनिटी स्प्रेड करणाऱ्या पार्ट्यांच्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या इतर बातम्या :