पालघर : एका बाजूला कोरोना संक्रमणाच संकट उभे आहे. तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील काही भागात भीषण पाणी टंचाईच संकट आ वासून उभं ठाकलंय. वाडा तालुक्यातील तोरणे गावठणसह अन्य दोन पाड्यात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू असून अद्याप दोन महिने पाण्यावाचून कसे काढायचे असा प्रश्न लोकांना पडला आहे. गावात कुठेही पाणी मिळत नसल्याने ओहळाच्या काठी डबके खोदून त्यातील पाणी पिण्याची वेळ लोकांवर आली आहे.
वाडा तालुक्यातील कुयलू ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तोरणे गावठण, धिंडेपाडा, रोजपाडा येथे साधारण साडेचारशे ते पाचशे लोकसंख्या असून एप्रिल महिन्यापासून गावातील बोअरवेल व विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्यासाठी व दैनंदिन गरजेसाठी पाणी उपलब्ध नसल्याने गावाच्या शेजारी असलेल्या ओहळाच्या कडेला डबकी खोदून त्यातील पाणी पिण्याची वेळ लोकांवर आली आहे. या डबक्यातून उपलब्ध पाणीही इतक्या कुटुंबांची तहान भागवू शकत नसल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. तर या डबक्यातील पाणी अशुद्ध असून यातून काही आजार उद्भवण्याची शक्यता ग्रामस्थानी व्यक्त केली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा, एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात होणार
नागरिक दुहेरी संकटात
गावात जलस्वराज्य प्रकल्पातून उभारलेली पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, ती अनेक वर्षांपासून बंद आहे, ज्याचे कोणतेही ठोस कारण कुणाकडेही नाही. गावात विहिरी व बोअरवेल असून पाण्याची पातळी खोल गेल्याने या गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याचे सर्व यंत्रणा सांगते. मात्र, कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी यासाठी एकतर बंद पाणीपुरवठा योजना सुरू करावी अन्यथा लघु पाणीपुरवठा योजना करण्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. कोरोनाचे संकट सर्वत्र पसरले असून संचारबंदीत कामधंदे व मजुरीही बंद आहे. एकीकडे उपासमारी तर दुसरीकडे पाण्याची चणचण अशा दुहेरी संकटाचा सामना तोरणे वासीय करीत आहेत.
उद्योगधंदे, शेती व्यवसाय वाचवण्यासाठी केंद्राच्या मदतीची आवश्यकता : रोहित पवार
टँकरचीही सोय नाही
खरंतर तोरणे हा गाव औद्योगिक व सुशिक्षित पट्यात येत असला तरी पिण्याच्या पाण्याची समस्या एप्रिल ते जून महिन्यात आम्हाला त्रस्त करून सोडते. टँकर हा एकमेव उपाय दरवर्षी अवलंबून शासन वेळ मारून नेत असलं तरी गावातील बहुसंख्य आदिवासी लोकवस्ती असलेल्या बांधवांना कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था व्हावी अशी अपेक्ष नेहा भेरे या ग्रामस्थांनी केली. तर, या गावाचा टँकर मागणीचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे पाठविला असून त्याला मंजुरी मिळताच गावात टँकर सुरू केले जाईल. गावात लघु पाणीपुरवठा योजनेबाबत देखील आम्ही सकारात्मक विचार करीत असल्याची माहिती प्रमोद भोईर (शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पं. स. वाडा) यांनी दिली. तोरणे गावात उद्भवलेल्या पाणी टंचाईबाबत प्रस्ताव पाठविला असून टँकर सुरू करण्याची मागणी आहे. गावातील पाण्याची पातळी अतिशय खोल असल्याने विहिरी व बोअरवेल असून नसल्यासारख्या होतात आणि याच कारणामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अडचणी निर्माण होतात, असे मत अरुण भांड (ग्रामसेवक, ग्रा.पं. कुयलू) यांनी मांडले.
Corona Update | पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 एप्रिलला देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार