Water level : देशातील 146 धरणांमध्ये 33 टक्के जीवंत पाणीसाठा, मागील वर्षीच्या तुलनेत पाणीपातळी घटली; वाचा कोणत्या राज्यात काय स्थिती?
Dam Water level : देशातील 146 धरणांमध्ये (Dam) सद्यस्थितीत 59.503 अब्ज घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
Dam Water level : देशातील 146 धरणांमध्ये (Dam) सद्यस्थितीत 59.503 अब्ज घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. या 146 धरणांची एकूण जिवंत साठवण क्षमता 178.185 अब्ज घनमीटर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये असणारा पाणीसाठी कमीच आहे. केंद्रीय जल आयोगानं याबाबतची माहिती दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्तर भारतातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याची माहिती केंद्रीय जल आयोगानं दिली आहे.
देशात उपलब्ध असलेल्या जिवंत पाणीसाठ्याची स्थिती
केंद्रीय जल आयोग साप्ताहिक आधारावर देशातील 146 धरणांच्या जिवंत पाणी साठवण स्थितीचे निरीक्षण करते. यापैकी 18 धरणे जलविद्युत प्रकल्पातील आहेत, या धरणांची एकूण प्रत्यक्ष साठवण क्षमता 34.960 अब्ज घनमीटर आहे. 146 धरणांची एकूण जिवंत साठवण क्षमता 178.185 अब्ज घनमीटर आहे. धरण जलसाठवण संदर्भातील विवरणानुसार ,या धरणांमध्ये उपलब्ध असलेला जिवंत पाणीसाठा 59.503 अब्ज घनमीटर असून एकूण जिवंत साठवण क्षमतेच्या 33 टक्के आहे. तथापी, मागील वर्षी याच कालावधीमध्ये या धरणांमध्ये उपलब्ध जिवंत जलसाठा 69.726 अब्ज घनमीटर होता आणि गेल्या 10 वर्षांची या जलसाठ्याची सरासरी 53.904 अब्ज घनमीटर होती. 146 धरणांमध्ये उपलब्ध असलेला जिवंत साठा हा गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील जिवंत साठ्याच्या 85 टक्के आणि गेल्या दहा वर्षांच्या सरासरीच्या 110 टक्के इतका आहे. एकूण साठवण स्थिती संपूर्ण देशात गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा कमी आहे. मात्र, मागील दहा वर्षांच्या याच कालावधीतील सरासरी साठ्यापेक्षा ती चांगली असल्याची माहिती जल आयोगानं दिली आहे. 146 धरणांच्याउपलब्ध डेटाच्या आधारे दिनांक 13 जुलै 2023 च्या जलाशय साठ्याच्या विवरणानुसार,देशात निर्माण होणाऱ्या अनुमानित एकूण जिवंत पाणीसाठा 257.812 अब्ज घनमीटरच्या तुलनेत देशात अनुमानित जिवंत पाणीसाठा 83.816 अब्ज घनमीटर आहे.
चांगला पाणीसाठा असलेली राज्ये
संबंधित कालावधीसाठी मागील वर्षाच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असलेल्या राज्यामध्ये बहुतेक राज्य ही उत्तर भारतातील आहेत. यामध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंड, ओडिशा , उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
मागील वर्षीप्रमाणेच समान जलसाठा असलेली राज्ये
मागील वर्षीप्रमाणेच समान जलसाठा असलेल्या राज्यामध्ये एकच राज्य आहे. सध्या गुजरातमध्ये मागील वर्षीएवढाच पाणीसाठी आहे. सध्या गुजरातमध्येही चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीपेक्षा कमी जलसाठा असणारी राज्य
संबंधित कालावधीसाठी गेल्या वर्षीपेक्षा कमी जलसाठा असलेल्या राज्यामध्ये पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा (दोन्ही राज्यांमधील दोन एकत्रित प्रकल्प), आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या: