(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धुमाकूळ घालणाऱ्या माकडाचं वर्ध्यात रेस्क्यू ऑपरेशन! अखेर 100 फूट उंच टॉवरवर चढून वाचवलं...
Wardha News Update: माकड जवळपास 100 फुट उंच असलेल्या टॉवरवर चढले, त्याचं रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला वाचवण्यात आलं आहे.
Wardha News Update: शेतीची कामे सुरू असल्याने शेतातील बियाण्यांवर ताव मारण्यासाठी माकडं (Monkey Issue In Wardha) धुमाकूळ घालत आहेत. अशातच नागपूर येथील हिंगणा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पेंढरी या जंगला लगतच्या गावात कळपापासून भरकटलेल्या एका नर माकडाने (Monkey) परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला असून दहशत निर्माण केली होती. हे माकड गावकऱ्यांवर हल्ला सुद्धा करत होते. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये माकडाची भीती निर्माण झाली होती. यामुळं अनेकांनी परिसरातून ये जा बंद केली होती. हे माकड जवळपास 100 फुट उंच असलेल्या टॉवरवर चढले, त्याचं रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला वाचवण्यात आलं आहे.
माकडाने मोबाईल टॉवरवर केले होते वास्तव्य
पेंढरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात या माकडाने आपले बस्तान मांडले असून तेथील शाळेकरी मुलांवर सुद्धा वारंवार हल्ला करायचे. गावकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरल्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे सुद्धा बंद झाले होते. स्थानिक पातळीवर वनविभागामार्फत त्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र सर्व प्रयत्न विफल होताना दिसत होते. ज्यावेळी त्याला पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले त्यावेळेस पेंढरी गावातील 90 ते 100 फूट मोबाईलच्या टॉवरवर सदर माकड आपले बस्तान मांडायचे त्यामुळे टॉवरवर चढून त्याला पकडणे कठिण झाले होते. वनविभागापुढे या माकडाला पकडणे एक मोठे आव्हान होते.
हौदोस घालणाऱ्या माकडाची दहशत :
सदर वानराला जेरबंद करण्याकरता वर्धेतील पीपल फॉर अॅनिमल्स वन्यप्राणी बचाव केंद्राच्या चमूला पाचारण करण्यात आले. मात्र त्यांना सुद्धा या वानराला पकडण्याकरता बराच आटापिटा करावा लागला. या मोहिमेदरम्यान गावकऱ्यांनी बरीच गर्दी केलेली होती. गर्दीला पाहून हे माकड बेभान झाले होते. या घरावरून त्या घरावर सतत उड्या मारून हुलकावणी देत होते.
अखेर दोन तासाच्या प्रयत्नानंतर सदर माकड परत एकदा गावात स्थित मोबाईल टॉवरवर चढले. मोबाईल टॉवरवर चढून या वानराला पकडणे अत्यंत जोखमीचे होते. वनविभाग आणि पीपल फॉर अॅनिमल्सच्या चमूने ही जोखीम पत्करून 80 ते 90 फूट वर चढून अखेर या हैदोस घालणाऱ्या माकडाला जेरबंद केले आणि गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर सदर माकडाला वनविभागाच्या स्वाधीन करून दाट जंगलात मुक्त करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या
Waygaon Turmeric : वायगावच्या हळदीचं वेगळेपण काय? का वाढतेय या हळदीला मागणी....