(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवारांचा शिवसेनेला दणका, विरोधी पक्षातच बसणार असल्याची भूमिका स्पष्ट
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला चांगलाच दणका दिला आहे. आपण विरोधी पक्षातच बसणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी बाकावरच बसणार असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. पवारांच्या या विधानामुळं शिवसेनेची मात्र चांगलीच गोची झाली आहे. शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याच्या शिवसेनेच्या स्वप्नांवर पाणी पडण्याची चिन्हं आहेत. शरद पवार काल नाशिक दौऱ्यावर होते. यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
शरद पवारांनी यावेळी शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या वादावरुन दोन्ही पक्षांना लक्ष्य केले. पवार म्हणाले की, राज्यात सत्तास्थापनेवरुन सुरु असलेली शिवसेना-भाजपची चढाओढ हा पोरखेळ आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू अफवा गेल्या दोन-तीन दिवसांपासून समोर येत आहेत. त्यातील तपशील गुलदस्त्यात असला तरी, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि अन्य खात्यांची विभागणी असा तोडगा निघू शकतो. काँग्रेसने यापूर्वीच शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास गांभीर्याने विचार केला जाईल, असं जाहीर केल्यानं काँग्रेसही या नव्या समीकरणात महत्त्वाची ठरणार आहे.
गेल्या काही दिवसात शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबर रोजी शरद पवार यांची भेट घेतली होती तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे शिवसेनेला राष्ट्रवादी पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु काल नाशिकमधील पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी सर्व अफवांचे खंडण केले आहे, तसेच सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
पाहा काय म्हणाले शरद पवार?
तर निवडणूक निकालानंतर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला फार महत्व न देण्यासारखं वर्तन ठेवल्याचा शिवसेनेला राग आहे. दिवाळीदरम्यान फडणवीसांनी सत्ता आणि मुख्यमंत्रीपदाबाबत समसमान वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं वक्तव्य केल्यानं पुढील चर्चा फिस्कटल्याची नाराजी उद्धव ठाकरेंनीही जाहीर मांडली होती. मात्र, त्यानंतरही भाजपकडून कोणताही ठोस संवाद शिवसेनेशी केला जात नाहीये. उपमुख्यमंत्रीपद आणि 16 मंत्रिपदं आणि त्यातही महत्वाची खाती भाजपकडेच याच फॉर्म्यूलावर भाजप अडून बसल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता शिवसेनेतील काही नेत्यांना असे वाटते की, शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तास्थापन करावी. परंतु शरद पवारांनी शिवसेना नेत्यांच्या या इच्छांवर पाणी फेरले आहे.
शरद पवारांसमोर शेतकऱ्यांना अश्रू अनावर
मुख्यमंत्र्यांच्या फोनला उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद नाही?