विठ्ठल मंदिर उघडणार पण अजून अधिकाऱ्याची खुर्ची मोकळी असल्याने नियोजनाचे तीनतेरा
कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची बदली होऊन 15 दिवस होत आले तरी अजून नवीन अधिकाऱ्याची नेमणूक झाली नाही. असं असताना 7 ऑक्टोबरपासून मंदिर भाविकांना खुले होणार आहे.
पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे 7 ऑक्टोबर पासून सुरु करण्याची परवानगी दिली आहे. असं असताना विठ्ठल मंदिराचे कार्यकारी अधिकाऱ्याची खुर्ची बदलीमुळे गेल्या 15 दिवसांपासून मोकळी असल्याने नियोजनाचे तीनतेरा झाले आहेत.
विठ्ठल मंदिर हे विधी व न्याय विभागाकडे येत असल्याने येथे उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रतिनियुक्ती दिली जाते. येथील कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची बदली होऊन 15 दिवस होत आले तरी अजून नवीन अधिकाऱ्याची नेमणूक झाली नाही. असं असताना 7 ऑक्टोबरपासून मंदिर भाविकांना खुले होणार आहे.
एकाबाजूला गेल्या सहा महिन्यापासून विठ्ठल भाविकांच्या भेटीला आतूर झाला असताना मंदिरे उघडण्यासाठी शासनाच्या नियमावलीचे पालन करणे, किती भाविकांना रोज दर्शनसाठी सोडणे अशा अनेक गोष्टीबाबत 5 ऑक्टोबर रोजी मंदिर समितीची ऑनलाईन बैठक होणार आहे. या बैठकीलाही शासनाचा प्रतिनिधी म्हणून कार्यकारी अधिकाऱ्याची गरज असताना अजून ही खुर्ची मोकळी असल्याने नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आहे.
दुसऱ्या बाजूला आता दर्शन व्यवस्था सुरु करताना ऑनलाईन दर्शन न देता थेट भाविकांना रांगेतून दर्शन देण्याची मागणी राज्यभरातील भाविकांतून करण्यात येत आहे. विठुरायाचे सदेव भक्त हे गोरगरीब वर्गातून येत असल्याने जो दर्शनाला पंढरपुरात येईल त्याला नियम पळून रांगेतून दर्शनाला सोडावे अशी मागणी भाविक करत आहेत. ऑनलाईन दर्शन व्यवस्थेमुळे ठराविक भाविकांनाच दर्शन घेता येते. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही देवाच्या दर्शनाची वाट पाहत असून जे दर्शनाला येतील त्या सर्व भाविकांना थेट दर्शन रांगेतूनच दर्शन द्यावे अशी मागणी भाविकांतून होत आहे.