एक्स्प्लोर
'विठ्ठला'ला विठ्ठल पावला...! 6 वर्ष विणेकरी म्हणून सेवा देणाऱ्या बडे दाम्पत्याला महापूजेचा मान
लॉकडाऊनमध्ये चोवीस तास मंदिरात सेवा देणारे विणेकरी विठ्ठल बडे हे मानाचे वारकरी ठरले आहेत. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.
पंढरपूर : यंदा आषाढी यात्राच नसल्याने मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी कोण ठरणार व्याबाबत मोठी उत्कंठा होती. मंदिर समितीने बैठकीत सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मंदिरात चोवीस तास विणेकरी म्हणून सेवा देणारे विठ्ठल ज्ञानदेव बडे या 84 वर्षांच्या वारकऱ्याला हा मान देण्याचा निर्णय घेतला. विठ्ठल बडे हे मानाचे वारकरी ठरले आहेत. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.
मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बडे यांना हा मान देण्यात येईल, याबाबत सांगितले आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवासी असून गेली 6 वर्षे ते मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत. बडे यांचे संपूर्ण कुटुंब माळकरी असून गेल्या तीन महिन्यापासून लॉकडाऊन असताना ते 24 तास ही सेवा देत आहेत.
दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे आणि अनुसया बडे यांना मान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बडे दाम्पत्याचा सत्कार केला गेला.
देव आपलं संकट नक्की दूर करेल, अशी प्रतिक्रिया विठ्ठल बडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. आम्हाला यंदा महापूजेचा मान मिळाला, याचा मोठा आनंद झाला आहे. विठुराया आपल्यावरील कोरोनाचं संकट नक्की दूर करेल, असं ते म्हणाले.
आषाढ शुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास शोभेच्या जांभळ्या , पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या फुलांनी सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.
PHOTOS | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा, विठुरायाचं देखणं रुप!
विठुराया,आषाढीपासून कोरोनाच्या संकटातून बाहेर काढ: मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. हा मान मला मिळेल असं स्वप्नातही वाटत नव्हतं. अशी पूजा करावी लागेल, असंही कधी वाटलं नव्हतं. मी माऊलीला साकडं घातलं आहे. आता आम्हाला चमत्कार दाखव, मानवानं हात टेकलेत. आपल्याकडे काही औषध नाही. असं तोंडाला पट्टी घालून कुठवर जगायचं. संपूर्ण आयुष्य अडकून गेलं आहे. आजपासून, या आषाढीपासून आम्हाला या कोरोनाच्या संकटातून बाहेर काढ. संपूर्ण जगाला पुन्हा आनंदी, मोकळं जीवन जगायला मिळू दे, असं साकडं घातलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी आहे. यामुळे यंदा विठ्ठलाची दर्शन रांग रिकामी आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपासून पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि त्याच्या दहा किलोमीटर परिसरात 30 जूनपासून दोन जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement