उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्यात पोलीस अत्याचाराच्या निषेधार्थ गाव बंद
पोलिसांच्या निषेधार्थ आज परांडा तालुक्यातल्या अनाळा गावात बंद पुकारण्यात आला असून ग्रामस्थांनी निवेदनात व्यापाऱ्यांना विनाकारण मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत आज गाव बंद पुकारला आहे.
उस्मानाबाद : पोलिसांच्या निषेधार्थ आज परांडा तालुक्यातल्या अनाळा गावात बंद पुकारण्यात आला आहे. काल पोलिसांनी आनाळा गावातल्या दुकानदारासह सहा जणांच्या विरोधात पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. त्यातला एक जणाला अटक केली आहे. पाच जण फरार आहेत. परंतु गावकऱ्यांच्या मते सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यापारी आणि ग्रामस्थांना आधी बेदम मारहाण केली. त्यातून पुढे ही घटना उद्भवली. त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे चुकीचे आहेत. त्यामुळे पोलिसांचा निषेध करण्यासाठी आज गाव बंद पुकारण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात व्यापाऱ्यांना विनाकारण मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत आज गाव बंद पुकारला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी पोलीसांच्या गाडीमधून सोनारी गावाकडं निघाले होते. त्यावेळी वाटेत असलेल्या अनाळा गावातील चौकात मोतीलाल गादिया यांच्या दुकानासमोर गाड्यांची पार्किंग आणि गर्दी दिसून आली. पोलीस कर्मचाऱ्यांनी खाली उतरून दुकानदार गादिया यांना कोरोनामुळे अशी गर्दी होऊ देऊ नका, सोशल डिस्टंसिंग पाळा अशा सूचना दिल्या. परंतु दुकानदाराने या गाड्या माझ्या नाहीत, असं पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर वादावादी होऊन झालेल्या घटनेमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवरती दुकानदार आणि इतर साक्षीदारांनी दगडफेक केली. पोलिसांच्या गाडीवरती हल्ला चढवला. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी झाले. अशी तक्रार एकूण सहा जणांच्या विरोधात दाखल केली आहे. त्यापैकी कमलेश गादीया यांना पोलिसांनी अटक केली. परंतु कालच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ग्रामस्थ पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्ही विनाकारण मारहाण का करता अशी विचारणा करत असताना दिसत होते. त्याशिवाय पोलीस सहाय्यक निरीक्षक आणि एवढा मोठा पोलीस बंदोबस्त बरोबर असताना साधे व्यापारी असं धाडस करतील काय याचीही चर्चा होती.
ग्रामस्थांच्या तक्रारीमधून हाच मुद्दा पुढे आला आहे. सहायक पोलीस निरिक्षक पालवे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी विनाकारण दुकानदारांना मारहाण केली. एका पोलीस कर्मचाऱ्याने विकत घेतलेल्या कुलरचे पैसे दिले नाहीत. उलट ते पैसे का मागितले याचा या पोलीस कर्मचाऱ्यांना राग होता. त्यातूनच काल विनाकारण व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात आली, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. पोलीस बंदोबस्त आणि पोलीस अधिकारी बरोबर असताना ज्यांचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, असे पोलीस कर्मचाऱ्यांवरती हल्ला करण्याचे धाडस व्यापारी करतील का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्यामुळे अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.
वारंवार आणि अचानक पुकारले जाणारे बंद, सोशल डिस्टंसिंगच्या नावाखाली सर्वसामान्यांकडून होणारी वारेमाप वसुली यामुळे सुद्धा सर्वसामान्यांबरोबरच व्यापारी त्रस्त झाले आहेत. दुकानाचं भाडं दुकानातल्या कामगारांचे पगार, दुकानातला कच्चामाल, विक्रीयोग्य त्यावरचे व्याज याचे आर्थिक गणित जुळत नाही. पगारी कर्मचारी असलेली मंडळी कधीही बंद पुकारतात. त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसतो. अशाच वैतागलेल्या व्यापाऱ्याकडून कालची घटना घडली असावी. परंतु या घटनेमागे आधीची काही कारणं दडली आहेत. असा ग्रामस्थांचा आरोप आहे. शिवाय पोलिसांच्या वाढत्या आरेरावी बद्दल ही ग्रामस्थांनी निवेदनामध्ये प्रश्न विचारले आहेत.