Vidya Chavan : राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची वर्णी, विभागनिहाय अध्यक्षांचीही निवड
रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त झालं होतं. या पदावर आता विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची वर्णी लागली आहे.
Vidya Chavan as NCP Women State President : राष्ट्रवादी महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची नियुक्ती करण्यात येतं आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त झालं होतं. या पदावर आता विद्या चव्हाण यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी या निवडीची अधिकृतरित्या घोषणा केली. राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्षांसह विभागनिहाय अध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीनंतर विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे की, देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. आम्ही यावर सातत्याने आवाज उठवणार आहोत. रुपाली चाकणकर यांच्या नंतर अध्यक्षपद खाली होतं. आता यावर माझी निवड झाली आहे, असं चव्हाण म्हणाल्या. पहिल्यांदा आम्ही विभागवार अध्यक्ष करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
विभागनिहाय राष्ट्रवादी महिला अध्यक्षा
नागपूर विभाग - शाहीन हकीम
अमरावती विभाग - वर्षा निकम
मराठवाडा विभाग 2
औरंगाबाद विभाग - शाझिया शेख
लातूर विभाग - वैशाली मोते
पश्चिम महाराष्ट्र - कविता म्हेत्रे
पुणे विभाग - वैशाली नागवडे
कोकण विभाग 2
सिंधुदुर्ग विभाग - अर्चना घारे
ठाणे विभाग - ऋता आव्हाड
उत्तर महाराष्ट्र विभाग - अनिता परदेशी
मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचा सक्रिय राजकारणात
मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला आहे. ऋता आव्हाड यांची राष्ट्रवादी महिला ठाणे विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सध्या भाजपमध्ये असलेल्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आली. त्यामुळं त्यांना राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याच पदावर आता चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या अभ्यासू नेत्या अशी ओळख आहे. त्यांना विधानपरिषदेवर देखील संधी देण्यात आली होती.