Vidarbha Unseasonal Rain: हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात (Vidarbha) पुन्हा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. तर या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय. अशातच आज विदर्भातील बुलढाणा आणि अकोला वगळता उर्वरित जिल्ह्यांत अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटास 30-40 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाजही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
एकीकडे राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असताना, दुसरीकडे मात्र पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने, ऐन उन्हाळ्यात पावसाळा अनुभवायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. तर कुठे अनेकांना यात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने संकटाचे ढग आणखी गडत होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अवकाळीमुळं 257 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचं नुकसान
उन्हाळा लागलेला असतानाच एप्रिल महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलीय. यात काही ठिकाणी गारपीट तर कुठं वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आहे. 1 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान भंडारा जिल्ह्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनानं तयार केला आहे. यात 257 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालं असून याचा फटका 424 शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळं उन्हाळी भात पीक, आंबा, भाजीपाला, टरबूज, भाजीपाला आणि फळपीकांचं मोठं नुकसान झालं आहे. यात 18 घरांचं अंशतः नुकसान झालं असून वीज पडून 6 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाचा हा प्राथमिक अहवाल असून यात नुकसानीचा आकडा आधिक वाढू शकतो. असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी
यवतमाळ जिल्ह्यातील काही भागामध्ये पहाटे तीन वाजताच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी काही भागात गारही पडली. यात अर्धातास झालेल्या अवकाळी मूसळधार पावसामुळे शेतातील तीळ, उन्हाळी ज्वारी, आंबा, पालेभाज्या या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रामुख्याने यात तीळ पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा काही काळ खंडित झाला असून अद्यापही विधुत पुरवठा खंडित आहे.
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील निंबी पार्डी परिसरात रात्री तीन वाजताच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे व गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने शेतपिकांचे आणि गावातील घराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर कुठे मोठमोठी झाडे पडली असून घरावरील टिन-पत्रे उडाली. तसेच विजेची तारे तुटल्याने बराच वेळ वीज पुरवठाही खंडित झाला आहे.
हाता तोंडाशी आलेला घास अवकळीने हिरावला
वर्ध्यातील कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कारंजा तालुक्यात सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळ पारडी, एकांबा, आजनादेवी, नारा या भागात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.गारपिटीमुळे बागायत पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा फटका हा संत्रा,आंबे अशा झाडांना बसला असून अनेक झाडाची अक्षरक्ष: पडझड झाली आहे. तर नारा येथील रामकृष्ण मानमोडे यांच्या तीन एकर शेतात टमाटर ,भेंडी, वांगे, कांदे असा भाजीपाला पीक लावले होते. मात्र अवेळी आलेले अवकाळी आणि गारपीटीने तोडणीला आलेल्या टमाटर मातीमोल केले आहे. हात तोंडाशी आलेले टमाटर गारपीटत फुटल्याने जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
अद्याप एकदाही तापमान 43 अंशांपर्यंत पोहोचलं नाही
विदर्भात उन्हाळा म्हणजे एप्रिल आणि मे महिना. मात्र यावर्षी एप्रिल महिना संपत आला तरी विदर्भात खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही. नागपुरात एकदाही कमाल तापमान 43° अंशांपर्यंत पोहोचलेलं नाही. दर चार-पाच दिवसानी होणाऱ्या अवकाळी पावसामुळे उन्हाळ्याची तीव्रता जाणवत नसली. तरी हवामानातील ही अनिश्चितता जून महिन्यात मान्सूनच्या विलंबाचा कारण तर बनणार नाही ना, अशीही चिंताही निर्माण झाली आहे
इतर महत्वाच्या बातम्या