मुंबई:  जिद्द आणि मेहनतीच्या जीवावर काहीही करता येऊ शकतं हे धुळ्यातील अभिजीत पाटीलने सिद्ध करुन  दाखवलं आहे. यूपीएससीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये अभिजीत पाटीलने देशभरातून 226 वा क्रमांक मिळवला आहे. चार वेळा अपयश आल्यानंतरही खचून न जाता सातत्य ठेवत पाचव्यांदा यश खेचून आणलं आणि आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. 


अभिजीतचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धुळ्यातील जयहिंद शाळेतून झालं. सिंहगड कॉलेजमधून त्याने मेकॅनिक इंजिनिअरिंग पूर्ण केलं. या परीक्षेमध्ये तो पहिला आला होता. पहिल्याच वर्षी त्याला कॉग्निझंट या कंपनीत नोकरी मिळाली. पण त्याला पहिल्यापासूनच जिल्हाधिकारी व्हायचं होतं. वडील सरकारी अधिकारी होते. त्यांची इच्छा ही आपल्या मुलाने तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी व्हावी अशी इच्छा होती. त्यामुळे नोकरी जरी मिळाली असली तरी अभिजीतचं मन त्यामध्ये लागत नव्हतं. मग त्याने निर्णय घेतला आणि पुणे गाठलं. पुण्यामध्ये चाणक्य मंडलमध्ये त्याने अभ्यासाला सुरूवात केली. 


दिल्लीमध्ये केली अभ्यासाची तयारी
काहीही करायचं पण पास व्हायचंच असा पण केलेल्या अभिजीतने नंतर दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्याने अभ्यासाचे नियोजन केलं. पहिल्या दोन प्रयत्नामध्ये अभिजीतच्या हाती काहीच लागलं नाही. पण निराश न होता त्याने प्रयत्न सुरूच ठेवले. तिसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने मुलाखतीपर्यंत मजल मारली. तेच चौथ्या प्रयत्नावेळीही झालं. पण सलग दोनदा मुलाखतीपर्यंत गेलेल्या अभिजीतला यशाने पाचव्या प्रयत्नावेळी मात्र यश मिळालं. पाचव्या प्रयत्नामध्ये अभिजीत देशात 226 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. 


यूपीएससीची तयारी करताना अभिजीतचा ऑप्शनल सब्जेक्ट हा भूगोल होता. या विषयाचे त्यांने प्रचंड वाचन केलं, लिखाण केलं. तसं वाचनाची आवड त्याला लहानपणापासूनच होती. अभिजीतने आतापर्यंत अनेक कादंबऱ्या वाचल्या आहेत. मोठ्या-मोठ्या कांदबऱ्या अभिजीत बघता-बघता वाचायचा असं त्याच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 


अभिजीतच्या या यशात त्याचे वडील राजेंद्र पाटील आणि आई मंदाकिनी पाटील यांचा मोठा वाटा आहे. त्याचसोबत त्याचा मित्रपरिवारानेही त्याला साथ दिली. 


अभिजीतला फिटनेसची आवड आहे. त्यासाठी तो आहारावर ध्यान द्यायचा, तसेच त्याने वजनावर चांगलंच नियंत्रण ठेवलंय. अभिजीतला लॉन टेनिसची आवड आहे. या सर्वाचा फायदा त्याला यूपीएसचीच्या अभ्यासातही झाला. याच गोष्टींमुळे अभिजीत अनेक तास सलगपणे वाचन आणि लेखण करु शकला. 


अभिजीतचे हे यश आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारं आहे. एका सर्वसाधारण कुटुंबातून येऊन त्यांने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवलंय. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होतय. 


संबंधित बातम्या: