UPSC Success Story : वडील रिक्षाचालक, घरची परिस्थिती अत्यंत बेताची पण या सर्वांवर मात करत 'निळ्या आकाशाखाली काहीच अशक्य नाही' हि उक्ती पुरेपूर साकार केली आहे ती, नाशिकच्या स्वप्नील पवारने. नाशिकच्या द्वारका येथील स्वप्नील पवारने यंदाच्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत कुटुंबियांच्या मान उंचावली आहे. 


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससी परीक्षेचा आज निकाल लागला. अन सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. कारण यूपीएससी परीक्षेत नाशिकच्या स्वप्नील पवारने 418 वी रँक मिळवत यश खेचून आणले आहे. नाशिक येथे राहणारे रिक्षाचालक जगन्नाथ पवार यांचा मुलगा स्‍वप्‍नील याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत यश मिळवले. 


आईवडिलांच स्वप्न साकार केल्यानंतर पवार कुटुंबीयांनी स्‍वप्‍नीलचे अभिनंदन केले. यावेळी आईवडिलांच्या आनंदाला पारावर उरला नाही. अगदी शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार असलेल्‍या स्‍वप्‍नीलने पेठे विद्यालयातून दहावीत 93 टक्‍के गुण मिळविले होते. भरपूर शिकण्याच्‍या त्‍याच्‍या जिद्दीपुढे आर्थिक अडचणीसह अनेक गतिरोधक होते. परंतु, अडथळ्यांची ही शर्यत पार करत आईवडिलांच्या पाठबळावर स्‍वप्‍नीलने शिकण्याच्‍या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली.


स्वप्नील यांनी केटीएचएम महाविद्यालयातून बारावीची परीक्षा पास करत जेईई परीक्षेच्‍या माध्यमातून पुण्यातील विश्‍वकर्मा इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळविला. केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण करताना प्‍लेसमेंटच्‍या माध्यमातून त्यांनी फॅब्‍स इंटरनॅशनलमध्ये प्रकल्‍प अभियंता म्‍हणून काम पाहिले. दिवसभर नोकरी करायची आणि मिळेल त्‍या वेळेत अभ्यास करायचा, अशा सातत्यातून स्वप्नीलने पहिल्‍याच प्रयत्‍नात यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. मात्र रँक कमी आली, सर्व्हिस अपग्रेड करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा ठाम निर्धार केला. अन यशश्री खेचून आणली. सध्या स्वप्नील पवार यांची इंडियन रेल्वेची ट्रैनिंग सुरु आहे. मात्र नव्या यशामुळे स्वप्नीलचे आयपीएस होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. 


निकालानंतर स्वप्नील पवार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, सर्व्हिस अपग्रेड करण्यासाठी नव्या जोमाने अभ्यासाला लागलो, नोकरी करून व्यवस्थित वेळ देत अभ्यास केला. आज 418 वी रँक मिळाल्‍याने विशेष आनंद होतोय. त्यामुळे 24 तास अभ्यासात व्‍यस्‍त राहाण्यापेक्षा वेळेचे योग्‍य व्‍यवस्‍थापन करत कमी वेळ पण प्रभावी पद्धतीने उमेदवारांनी अभ्यास करावा. उपलब्‍ध संसाधनांचा योग्‍य वापर करता आला पाहिजे. 


दुसऱ्यांदा युपीएसीत यश 
स्वप्नील पवार यांनी यूपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा यश संपादन केले आहे. स्वप्नील हे सुरवातीला प्रकल्प अभियंता म्हणून कार्यरत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी अभ्यास सुरु ठेवला. नोकरीची जबाबदारी सांभाळून अभ्यासातही सातत्य ठेवत स्‍वप्‍नीलने पहिल्‍याच प्रयत्‍नात यश मिळवत अधिकारीपदाला गवसणी घातली. यावेळी त्यांना इंडियन रेल्वे सर्व्हिस मध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र आयपीएस होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. अखेर दुसऱ्या प्रयत्नात चांगल्या रँकने पास स्वप्नील पवार पास झाले. 


रँक चांगली आली! 
‘शाळेपासून यूपीएससी करण्याचे स्वप्न होते. मागील परीक्षेत देशात 632 वा क्रमांक मिळवून स्वप्नील पवार यांना इंडियन रेल्वेत पोस्टिंग मिळाली. पण रँक सुधारण्यासाठी स्वप्नील यांनी पुन्हा या अवघड परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्धार केला. गुणवत्तेला कष्टाची जोड मिळाली आणि अखेर स्वप्नील यांनी यूपीएससीतील चांगल्या रँकचे स्वप्न साकार झाले. मागील यूपीएससी परीक्षेतुन आयआरएससाठी निवड झालेली असतानाही रँक सुधारण्यासाठी मी पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि यश मिळाले’, असे स्वप्नील पवार यांनी सांगितले.