Pune Crime News : अनैतिक संबंधातून (Pune Crime News)  जन्मलेले बाळ रुग्णालयाच्या खिडकीतून फेकल्य़ाची धक्कादायक घटना समोर आली आहे. शारीरिक संबंधातून 19 वर्षीय तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर ती पाठीच्या दुखण्याचे आजार सांगून रुग्णालयात दाखल झाली. त्यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला. याविषयी कोणाला काही एक न सांगता हे बाळ तिने रुग्णालयाच्या खिडकीतून खाली फेकून दिले. हा संपूर्ण प्रकार शनिवारी नऱ्हे येथील काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये घडला आहे. याप्रकरणी 19 वर्षे तरुणीवर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. 


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 19 वर्षाची असलेली ही तरुणी सिंहगड रस्ता परिसरातील एका वसतिगृहात राहते. शारीरिक संबंधातून ती गर्भवती राहिली होती. दरम्यान आठ महिने झाल्यानंतर ती पाठीच्या आजाराचे कारण सांगून नवले हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. पाठ दुखत असून अशक्तपणा असल्याचे सांगत ती रुग्णालयात दाखल झाली होती. गर्भवती असल्याचे तिने रुग्णालयापासून लपवून ठेवले होते. 


दरम्यान शनिवारी सकाळी ती नवले हॉस्पिटल मधील कॅज्युअलटी वार्ड शेजारी असणाऱ्या एका स्वच्छतागृहात गेली. तिथे तिने एका बाळाला जन्म दिला आणि काहीही विचार न करता तिने हे बाळ खिडकीतून बाहेर फेकून दिले. या संपूर्ण घटनेत या नवजात बाळाचा मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाच्यावतीने या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करत आहेत.


महिला आयोगाकडून दखल


या घटनेची दखल महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटच्या माध्यमातून चौकशीचे आदेश दिले आहेत. "पुण्यात नऱ्हे भागातील एका हॅास्पिटलमधे 19 वर्षीय अविवाहित तरुणीने स्वच्छतागृहात मुलीला जन्म देऊन खिडकीतून बाहेर फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. नवजात अर्भकाचा यात मृत्यू झाला आहे.  राज्य महिला आयोगाने सदर प्रकरणात पोलिसांकडून माहिती मागविली आहे. सध्या या तरुणीवर उपचार सुरु असून याबाबत पोलिसांनी  सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत, असं त्यांनी ट्वीट केलं आहे. 

संबंधित बातमी-