Ukraine-Russia War: युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले ठाणे येथील मुस्कान आणि प्रीतम हे सुखरूप घरी परतले आहेत. प्रीतम मायदेशी परतल्यानंतर प्रीतमचे वडील सोन्या पाटील आणि त्यांच्या पत्नीला अश्रू अणावर झाले. हे दृश्य पहिल्यानंतर प्रीतमच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे आनंद अश्रूंनी डबडबले. मुस्कान शेख हिच्याही आई-वडिलांचा ती सुखरूप घरी परतल्याने आनंदअश्रूंचा बांध फुटला. मुस्कानच्या घरी देखील आनंदीत वातावरण निर्माण झाले असून केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.
भिवंडीतील पडघा परिसरातील मुस्कान शेख ही मागील चार वर्षांपासून युक्रेन मधील कीव्ह या शहरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेली होती. परंतु, युक्रेन आणि रशियामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे युक्रेनमधील परिस्थिती खूप बिकट झाली होती. खोली बाहेर निघणे देखील अशक्य झाले होते. बंकरमध्ये दिवस काढणे कठीण जात होते. जेवणासाठी काही मिळत नसल्याने बंकरच्या बाहेर जाऊन जीव धोक्यात टाकून जेवणाची व्यवस्था करावी लागत होती. परंतु, तेथील स्थानिक नागरिकांनी यावेळी मदत केली, असे मुस्कान हिने मायदेशी परतल्यानंतर सांगितले.
युक्रेमध्ये सतत होत असलेले गोळीबार ऐकून मुस्कान घाबरली होती. तिच्यासोबत अजून काही भारतीय विद्यार्थी होते. मुस्कान मायदेशी परतली असली तरी युक्रेनमध्ये अजून भारतीय विद्यार्थी अडकले असल्याची माहिती तिने दिली आहे.
भिवंडी शहरातील प्रीतम सोन्या पाटील हा पश्चिम युक्रेन भागातील डायनलो हलेसकी लविव नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये पाचव्या वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होता. या शहराला युद्धाच्या झळा कमी जाणवत होत्या. परंतु, रात्र बंकरमध्ये जागून काढावी लागत होती. यादरम्यान, भारतीय दुतावासाकडून या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी कोणतीही हालचाल दिसून न आल्याने 110 विद्यार्थ्यांनी खासगी बसच्या माध्यमातून 1 मार्च रोजी लविव शहर सोडले. 26 तासांच्या खडतर प्रवासानंतर हंग्री या देशाच्या सीमेवर येऊन पोहोचल्याचे प्रीतम याने सांगितले.
हंग्री येथे आल्यानंतर श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग या सेवाभावी संस्थेच्या आश्रमात या मुलांची मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी विद्यार्थी असल्याची माहिती भारतीय दूतावासाकडे नसल्यामुळे मुलांना तीन दिवस या ठिकाणी अडकून राहावे लागले. त्यानंतर मुलांनी मायदेशी परतण्यासाठी दूतावासाकडे मागणी केली. त्यानंतर ऑपरेशन गंगाअंर्गत ही मुले मायदेशी परतली.
शिक्षण पूर्ण होत आले असतानाच मायदेशी निघून यावे लागले, याचे दुःख मनात असले तरी युक्रेनवरील हल्ल्यामुळे तेथील भयानक परिस्थिती पाहून मायदेशी परत येण्याची ओढ लागली होती. त्यामुळेच आज घरी आल्याने आनंद झाला आहे. पुढील शिक्षण कसे पूर्ण होणार? याची चिंता असली तरी आज माझ्या कुटुंबीयांच्या सानिध्यात आहे, याचा आनंद असल्याचे प्रीतम याने सांगितले.
यूक्रेन येथील युद्धाची माहिती मिळाल्यानंतर काळजाचा ठोका चुकत होता. सर्वांच्या प्रयत्नाने मुस्कान आणि प्रितम घरी पोहचले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेले सर्व विद्यार्थी सुखरूप आपापल्या घरी यावेत अशा भावना मुस्कानच्या वडिलांनी व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या