धुळे : अयोध्या येथील विवादित जागेप्रकरणी समाजात तेढ निर्माण होणार नाही, शांतता अबाधित राहावी यासाठी पोलिसांसह नागरिक देखील प्रयत्न करत असताना धुळ्यात या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. शांतता भंग केल्याप्रकरणी धुळ्यात दोघांना अटक करण्यात आले आहे. धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवरील काही दुकानांच्या भिंतीवर राजेंद्र मराठे ऊर्फ राजू महाराज याने ऑइल पेंटने जय श्रीराम असे लिहित शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. या प्रकरणी राजेंद्र मराठेला अटक करण्यात आली आहे. तसेच धुळ्यातीलच गोरक्षक संजय शर्मा याने स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे त्याच्याविरोधात आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली आहे.


धुळे पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरवू नये, समाज माध्यमातून कुठल्याही जाती, धर्माविषयी आक्षेपार्ह टिपण्णी, व्हिडीओ, संदेश पोस्ट करू नये असं आवाहन केलं आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत कलम 144(1)(3) लागू करण्यात आलं आहे.

 देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल आज 

अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. सकाळी साडेदहा वाजता या निकालाचं वाचन सुरु होणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावर्षी 5 ऑगस्टपासून निकालाची नियमित सुनावणी सुरु झाली होती. त्यानंतर जवळपास 40 दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.

सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात निकाल लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज सुट्टीच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याचं ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीचं घटनापीठ हा निकाल सुनावणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.

शनिवारी सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असते. मात्र अयोध्या प्रकरणातल्या ऐतिहासिक निकालासाठी शनिवारचीच वेळ निवडण्यात आली. कदाचित न्यायालयात गर्दी होऊ नये, परिस्थिती हाताळणं सुरक्षा यंत्रणांना सोपं जावं यासाठी शनिवारचा दिवस निवडण्यात आला असावा, अशी शक्यता आहे.

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा, शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र निकालानंतर व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा सोशल मीडियातून आक्रमक आणि भडकाऊ टीका-टिप्पणी करणे टाळावे, असं आवाहनही पोलिसांकडून केलं जात आहे.

अयोध्या निकालानंतर या गोष्टी टाळा

  • जमाव करुन थांबू नका, भाषणबाजी करु नका.

  • सोशल मीडियावर अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज फॉरवर्ड करु नका.

  • निकालानंतर घोषणाबाजी करुन जल्लोष करु नये, गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत.

  • मिरवणूक रॅली काढू नये किंवा बाईल रॅली काढू नये.

  • महाआरती किंवा समूह पठण यांचं आयोजन करु नये.

  • निकालानिमित्त पेढे, मिठाई वाटू नये. कोणतंही वाद्य वाजवू नये.

  • कोणत्याही प्रकारची जातीय दंगल होईल, असे जुने व्हिडीओ, फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर करुन अफवा पसरवू नये.


वरील सूचनांचे उल्लंघन करुन जातीय तणाव निर्माण केल्यास, भावना भडकवल्यास भारतीय दंड संहिता कलम आणि इतर कायद्यांन्वये कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं आवाहनही करण्यात येत आहे.


संबंधित बातम्या