मुंबई : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा, शांतता राखण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र निकालानंतर व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा सोशल मीडियातून आक्रमक आणि भडकाऊ टीका-टिप्पणी करणे टाळावे, असं आवाहनही पोलिसांकडून केलं जात आहे.
अयोध्या निकालानंतर या गोष्टी टाळा
- जमाव करुन थांबू नका, भाषणबाजी करु नका.
- सोशल मीडियावर अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज फॉरवर्ड करु नका.
- निकालानंतर घोषणाबाजी करुन जल्लोष करु नये, गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत.
- मिरवणूक रॅली काढू नये किंवा बाईल रॅली काढू नये.
- महाआरती किंवा समूह पठण यांचं आयोजन करु नये.
- निकालानिमित्त पेढे, मिठाई वाटू नये. कोणतंही वाद्य वाजवू नये.
- कोणत्याही प्रकारची जातीय दंगल होईल, असे जुने व्हिडीओ, फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर करुन अफवा पसरवू नये.
वरील सूचनांचे उल्लंघन करुन जातीय तणाव निर्माण केल्यास, भावना भडकवल्यास भारतीय दंड संहिता कलम आणि इतर कायद्यांन्वये कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं आवाहनही करण्यात येत आहे.
रामजन्मभूमी विवादाचा निकाल उद्या अपेक्षित असून, या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या प्रकरणातील सर्व बाजू आणि सर्व पक्षांना ऐकल्यानंतरच हा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालानंतर समाजामध्ये सलोखा राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशाच प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा-सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. राज्य सरकार सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
यावर्षी 5 ऑगस्टपासून निकालाची नियमित सुनावणी सुरु झाली होती. त्यानंतर जवळपास 40 दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात निकाल लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र उद्या सुट्टीच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याचं ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीचं घटनापीठ हा निकाल सुनावणार आहे.
संबंधित बातम्या
- अयोध्या वाद : सुप्रीम कोर्टाचा कोणताही निर्णय आम्हाला मान्य - अशरफ मदनी
- Ayodhya Case : हिंदू महासभेच्या वकिलांनी दाखवलेला जागेचा नकाशा मुस्लीम पक्षाच्या वकिलाने फाडला
- Ayodhya Case : अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण, 15 नोव्हेंबरपूर्वी होणार अंतिम निर्णय
- Ayodhya Hearing | अयोध्याप्रकरणी दोन्ही पक्षांचे युक्तीवाद पूर्ण, सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला