सुनावणीदरम्यान पुरावे सादर करत असताना हिंदू पक्षकारांचे वकील विकास सिंह यांनी बाजू मांडत असताना कुणाल किशोर नावाच्या लेखकाच्या 'अयोध्या रिव्हिजिटेड' या पुस्तकाचा दाखला दिला. तसेच यावेळी सिंह यांनी या पुस्तकातील एक नकाशा न्यायालयासमोर सादर केला. परंतु मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी राम मंदिराचा छापील नकाशा फाडून टाकला. त्यामुळे न्यायालयात एकच गोंधळ उडाला होता.
मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांच्या या वर्तणुकीवर सरन्यायाधीस रंजन गोगोई यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गोगोई म्हणाले की, न्यायालयात असे प्रकार होणार असतील तर मी इथून निघून जाईन आणि सुनावणी संपल्याचं जाहीर करेन. तसेच लेखी स्वरूपात युक्तीवाद घेणार असल्याचा सज्जड दम दिला.
युक्तीवादादरम्यान विकास सिंह म्हणाले की, देवतेच्या मूर्ती काढल्यानंतरही ती जागा हिंदूंसाठी पूजनीयच आहेत. ते रामाचं जन्मस्थान आहे, त्याला मशिदीत बदलण्यात आल्यानंतरही हिंदू त्या जागेवर पूजा करतच होते. तिथे काही चिन्ह आहेत, ज्यांची पूजा हिंदू करत आले आहेत. आम्ही 15 ते 20 मीटर दूरवरुनही पूजा करतो. त्यामुळे जसं तिरुपतीला दुरुन पूजा केली जाते त्याचप्रकारे इथेही काही अंतरावरुन पूजा केली जात होती. इंग्रजांनी मंदिर परिसराला कुंपण घातल्यानंतरही हिंदू दूरवरुन पूजा करतच राहीले.
निर्मोही आखाड्याचे वकील म्हणाले की, मुळात बाबर अयोध्येला आला होता याचेच पुरावे नाहीत. त्यामुळे ती मशीद बाबराने बांधली होती, याचेही पुरावे मुस्लीम पक्षकारांना देता आले नाहीत. ती इमारत कायम मंदिरच होती. बाबराने काय केलं? काय नाही? याबाबत प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे मंदिर पाडून मशीद बांधली हा दावाही चुकीचा आहे.
मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन म्हणाले की, मी नकाशा फाडल्याचा प्रकार बाहेर व्हायरल होऊ लागला आहे. मला त्याबाबत स्पष्टीकरण द्यायचे आहे, की मी ते नकाशे फेकणार होतो परंतु सरन्यायाधीशांच्या परवानगीनेच मी नकाशा फाडला. आमची इमारत पाडली गेली आहे. वक्फ आणि मशीद दोन्हीला सरकारने मान्यता दिली होती. हिंदूंजवळ त्या जमिनीची मालकी कधीच नव्हती त्यांना केवळ प्रार्थनेची परवानगी दिलेली होती.
धवन म्हणाले की, बाबराने इथे येऊन आक्रमण केलं, तशी इतिहासात अनेक आक्रमणं झाली, हिंदूनीही केली. मग फक्त मुस्लीम आक्रमणं वेगळी कशी? आक्रमणांनाना हिंदू आणि मुस्लीम असं वेगळं करु शकत नाही. 1206 सालापासून मुस्लीम इथे आहेत. त्यामुळे आता मंदिराचे पुरावे देण्याची जबाबदारी हिंदूची आहे. इथे मशीद होती आणि कब्रस्तानही होतं. मुस्लीम तिथे शांततेत त्यांची नमाज अदा करत होते.