सोलापूर : सोलापुरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील सोलापुरात अधिक आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या आकड्यांमुळे नकारात्मक वातावरण तयार होत असताना सोलापुरातून एक सकारत्मक बातमी समोर येत आहे. सोलापुरात अवघ्या 13 दिवसांच्या बालकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची ही बालकं असल्याची माहिती सोलापुरातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. औदुंबर मस्के यांनी दिली.


सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे 26 मे रोजी दोन गरोदर महिलांची प्रसुती झाली. प्रसुती आधीच या महिलांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर कोरोना वार्डात उपचार सुरु होते. प्रसुतीनंतर चिमुकल्यांचे ही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. या दोन्ही बालकांचे अहवाल हे कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मात्र उत्तमरित्या उपचार केल्याने अवघ्या दहाच दिवसात या बालकांचे अहवाल पुर्नतपासणीत निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वयाच्या अवघ्या 13व्या दिवशी या दोन्ही चिमुकल्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकाच दिवशी प्रसुती झालेल्या या दोन्ही महिला आपल्या चिमुकल्यांसह एकाच दिवशी कोरोना मुक्तही झाल्या आहेत. या दोन्ही महिलांना डिस्चार्ज देतेवेळी हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशासनाने फुले उधळून पाठवण केली.


सोलापुरातील शासकीय रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्याने आपण बरे झालो, असे म्हणत कोरोनामुक्त मातांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार व्यक्त केले. या दोन गोंडस मुलांना जन्म देणऱ्या महिला शहरातील निलम नगर व विडी घरकुल या भागातील आहेत. सोलापूरच्या जनतेने हे उदाहरण लक्षात ठेवून मनातील भीती काढून टाकावी. कोरोना होऊ नये म्हणून काळजी घ्या पण कोरोना झाल्यास काळजी करू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. औदुंबर मस्के यांनी यावेळी केले. तसेच कोरोनावर मात करणारे हे दोन्ही चिमुकले महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची मुलं असल्याची माहीती डॉ. औदुंबर मस्के यांनी दिली. तसेच सोलापुरातील शासकीय रुग्णालयात कोरोनावरील सर्व उपचार असून रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जाते, असेही मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.


पाहा व्हिडीओ : रुग्णसंख्या लपवण्याच्या नादात लोकांचा जीव जातोय : प्रवीण दरेकर



शासनाच्या नियमानुसार, जर गर्भवती महिला प्रसुतीसाठी रुग्णालयात आली असेल तर तिची कोरोनाची चाचणी केली जाते. यामध्ये जर महिला नेगेटिव्ह असल्यास त्यावर नॉन कोविड वॉर्डात उपचार केले जातात. मात्र प्रतिबंधात्मक क्षेत्रातील गर्भवती महिला किंवा संशयित महिलांचे उपचार हे अहवाल प्राप्त होईपर्यंत कोविड वॉर्डातच स्वतंत्रपणे केले जातात. सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये आतापर्यंत 191 कोरोना संशयित गर्भवती महिलांची प्रसुती झाली. त्या सर्वांचे स्वॅब घेऊन तपासले असता त्यापैकी 25 महिला पॉजिटीव्ह आढळल्या. समाधानाची बाब म्हणजे, यापैकी 20 जणींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर उर्वरित पाच महिलांवर अजूनही उपचार सुरू आहेत.


दरम्यान, सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात रविवारी दिवसभरात 28 रुग्णांची भर पडली तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला. आतापर्यंत शहरात 1188 रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. तर 107 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 8 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आतापर्यंत 649 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. उर्वरित 432 जणांवर उपचार सुरू आहेत. सोलापुरात कोरोना बाधितांची संख्या जरी वाढत असली तरी योग्य उपचार मिळाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.


संबंधित बातम्या :

जिगरबाज शेतकरी दाम्पत्याने लॉकडाऊन काळात खोदली 30 फूट विहीर; खडकाळ जमिनीत फुलविली शेती

व्याख्यानं, कविसंमेलनं झाली लाईव्ह, कोरोना काळात सोशल माध्यमांवर ज्ञानाची भांडारं खुली

यंदा वारकऱ्यांविना आषाढी करण्यासाठी प्रशासन सज्ज, शहरातील मठ, धर्मशाळांची तपासणी