औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या वर्षात शाळा ऑनलाईन भरतील आणि ज्ञानदानाचे कार्य केलं जाईल असा अंदाज बांधला जातोय. असं होईल का? याचं उत्तर येणारा काळच देईल. पण या कोरोनाचा काळात फेसबुक पेजवर अनेकांनी ज्ञानाची भंडारा खुली केली आहेत. महाराष्ट्राला व्याख्यान मालांची मोठी परंपरा आहे. वसंत व्याख्यानमाला, नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला, सार्वजनिक व्याख्यानमाला अशी कित्येक या व्याख्यान मालांची नाव घेता येतील. या व्याख्यानमालेतून त्याचे विचार प्रवाही रुपात पुढे आले. याच व्याख्यानमाला, कविसंमेलन कार्यक्रमांनी लोकांचं मन तयार केलं आणि लोकांच्या बुद्धीला आवाहन करून त्याचा विवेक जागा केला.


मात्र कोरोनाच्या काळात लोकांच्या एकत्रित येण्याला बंदी आली आणि व्याख्यानमालांची पर्वणी पासून श्रोत्यांना मुकावं लागलं. मात्र ज्ञानाची भूक मात्र काही सोशल मीडियाच्या माध्यमातून भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. वाचन कट्टा कलाप्रेमी काव्यधारा हे असे अनेक पेज फेसबुकवर अविरत ज्ञानदानाचे काम करत आहेत. कुठे कवितांचा कार्यक्रम सुरु आहेत, कुठे सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत तर कुठे व्याख्यानमालेतून लोकांना ज्ञान वाटले जातेय.


लॉकडाऊनमुळे लोकांकडे भरपूर  वेळ होता. त्यामुळे त्या एरव्ही फेसबुकवर कधी तरी रेंगाळणाले लोक चांगलं काही शोधायला लागली. असे अनेक लेखक अनेक कवी यापूर्वी डिजिटल मीडियासमोर येत नव्हते ते ही फेसबुकवर,यू-ट्यूबवर दिसू लागली. वाचन कट्टा या ग्रुपचे डॉ. विश्वाधार देशमुख सांगतात की, "व्याख्यानमाला म्हटलं की ज्येष्ठांची गर्दी, कवी संमेलनाला तरुणाची दिसायची मात्र या नव्या प्लॅटफॉर्ममुळे सेंद्रिय श्रोता निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्या त्याच्या प्रयत्नांना यश आलं."


वेगवेगळ्या पेजवर हजारो श्रोते जोडली गेली आहेत आणि आपली ज्ञानाची भूक भागवत आहेत. कलाप्रेमी या पेजवरचे अनघा मोडक यांचे व्याख्यान असो की काव्यधारा या पेजवरील तरुणांच्या कविता सगळं काही श्रोत्यांच्या पसंतीस उतरले आहे. अशा पेजचे हजारोंच्या घरात व्हिवर्स वाढत आहेत. लॉकडाऊन या शब्दाभोवती आपली 75 दिवस गेले आहेत. कलाप्रेमी या फेसबुक पेजवर अनघा मोडक लॉकडाऊन या शब्दाभोवती एक तास  श्रोत्यांना खिळवून ठेवतात.


21 वं शतक ज्ञानाचं शतक आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात ज्ञानदानाची अचूक संधी या अशा अनेक पेजने ओळखली आणि श्रोत्यांच्या ज्ञानाच्या भूक भागवत ज्ञानदानाची वेगवेगळी माध्यमं वापरण्याच्या शक्यता खुल्या केल्या. या सगळ्या पेजने कोरोना काळाच्या प्रतिकुलतेला कृतिशील प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे व्याख्यानाची,कविसंमेलनाची आणि संस्कृती कार्यक्रमांची परंपरा अखंडित ठेवण्यात यश मिळालं. आणि श्रोत्यांच्या ज्ञानाची भूक काही भागली.