पंढरपूर : राज्यभर पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे यंदा आषाढी यात्रेच्या सोहळ्याला येणारे सर्व पालखी सोहळे रद्द करीत प्रशासनाने अगदी मोजक्या वारकऱ्यांसह मानाच्या सात संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने आणण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना राज्यभरातून एकही वारकऱ्याला या काळात शहरात प्रवेश न देण्यासाठी स्थानिक प्रशासनानेही कडक पावले उचलायला सुरुवात केली असून शहरातील भाविकांच्या निवासासाठी असणारे सर्व 450 मठ, धर्मशाळा, हॉटेल्स व इतर खाजगी ठिकाणांना नोटीस देऊन तपासणीला सुरुवात केली आहे . याशिवाय आता एकाही नागरिकाला पंढरपुरात प्रवेशासाठी परवानगी न देण्याचे पात्र राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.

आषाढी सोहळा हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. दरवर्षी या वरील राज्यभरातून 18 ते 20 लाख भाविक येत असतात. सध्या सर्वत्र कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने यात्रेला थोडे जरी भाविक आले तर हा प्रसार राज्यभर पसरणारा असल्याने शहरात एकही वारकऱ्याला आता प्रवेश न देण्याची तयारी प्रशासनाने गांभीर्याने सुरु केली आहे.

आषाढी वारी! हेलिकॉप्टर किंवा वाहनानं पादुका पंढरीला नेणार, वारकरी आणि अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

आषाढीला येणार भाविक पासेस घेऊन थोडे आधीच पंढरपुरात मुक्कामाला येऊ नये यासाठी शहरातील सर्व मठ व धर्मशाळांना प्रशासनाने नोटीस बजावून एकालाही राहण्यास जागा न देण्याचे आदेश दिले आहेत. सध्या या मठात आणि धर्मशाळेत असणारे मठाधिपती व सेवक यांची तपासणी पोलीस पथके जाऊन करीत असून प्रत्येक ठिकाणी नेमके कितीजण राहतात याच्या नोंदी गोळा करीत आहेत.

आषाढी वारी! यंदाची पंढरीची वारी पाहा कशाप्रकारे साजरी होणार!

वारी पोचवण्यासाठी वारकरी येनकेन प्रकारे पंढरपुरात पोहोचतात याचा अनुभव चार दिवसापूर्वी झालेल्या निर्जळी एकादशीला आला होता. यात नांदेड, लातूर, सांगली, सातारा आणि सोलापुरातून आलेल्या वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वारंटाईन करून ठेवले आहे. हे वारकरी इतक्या लांबून दुचाकीवर पंढरपुरात आले होते. आता हा धोका पत्करायचा नसल्याने शहरातील सर्व निवास स्थळांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

याशिवाय सर्व जिल्ह्यातून अधिकृत प्रवेश पासेस बंद केल्यानंतर पोलीस शहराची नाकेबंदी करून कोणालाच शहरात या कालावधीत प्रवेश देणार नाहीत. सध्या विठ्ठल मंदिर 30 जून पर्यंत बंदच राहणार असून 1 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा असणार आहे. वारकरी संप्रदायातील बहुतांश महाराजांनी यंदा आषाढी घरीच करण्याचे आवाहन केले असून कोरोनाच्या फैलावास वारकरी संप्रदायावर ठपका येऊ नये अशी भावना संप्रदायाची आहे. आता यामुळे प्रशासनावरील जबाबदारी वाढली असून आषाढी यात्रा होईपर्यंत कोणालाच शहरात प्रवेश करू न देण्याचे कर्तव्य त्यांना पार पाडावे लागणार आहे.