यवतमाळ : लॉकडाऊनच्या काळात अनेकजण काही ना काही करताना दिसत आहे. यात विशेष करुन इंटरनेटवर वेळ घालवणारे जास्त आहेत. मात्र, यवतमाळच्या एका जिगरबाज शेतकऱ्याने आपल्या शेतात विहीर असावी हे स्वप्न पाहिले. त्या स्वप्नासाठी जिद्दीने झोकून देऊन कष्ट उपसले आणि अडचणींवर मात करीत खडकाळ जमिनीत 30 फूट खोल विहीर खोदली. या विहिरीला पाणी लागले असून आता त्याच पाण्यातून शेतात सिंचन करीत आहेत. आर्णी तालुक्यातील लोनबेहळ येथील जिगरबाज शेतकरी रामदास पिलावन हे खऱ्या अर्थाने या भागातील लोकांसाठी प्रेरणास्रोत मांन्झी झाले आहेत.
रामदास पीलवन यांनी खडकाळ जमिनीत एकट्याने टीकास फावडे घेऊन विहीर खोदली आहे. दुसऱ्याच्या शेतात रोजमजुरी करून आल्यावर सायंकाळी स्वतःच्या 4 एकर कोरडवाहु शेतात जाऊन रात्र होईस्तोवर ते अविरत शरीर थकेपर्यंत विहीर खोदण्याचे काम करायचे. ज्या दिवशी गावात मजुरीचे काम मिळाले नाही त्या दिवशी त्यांची पत्नी तुळजा आणि रामदास पिलावन हे दाम्पत्य विहीर खोदायचे असे रोज रोज करीत अडथड्याची शर्यत पार करीत त्यांनी विहीर खोदली. आता त्या विहिरीला पाणी लागले आहे.
बादलीने पाणी काढून पिकांना पाणी
शेतात वीज कनेक्शन नसल्याने ते बादलीच्या किंवा डबकीच्या साहाय्याने झाडांना आणि पिकांना पाणी देतात. नुकतेच त्यांनी यात पद्धतीने कारलेच्या पिकांना पाणी देत पीक घेतले. आता त्यांनी खरबूजचे रोपं लावली असून खरीपमध्ये ते कापूस सोयाबीन आणि भाजीपाला पीक घेण्याचा त्यांचा मानस आहे. जेव्हा विहिरी खोदायला सुरुवात केली त्यावेळी त्यांची पत्नी गाळ उचलून टाकायची. रामदास पिलावन हे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून सायंकाळी आल्यानंतर ते स्वतःच्या शेतात विहीर खोदण्याचे काम करायचे. एकीकडे कुटुंबाची जबाबदारी त्यात शेतात विहीर असावी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते झटले आणि त्यांनी 30 फूट खोल विहिर खोदून दाखविली. विहिरीत उतरताना त्यांनी आपट्याच्या झाडाला दोर बांधून त्यानंतर काही लाकडी शिडी लावून पुन्हा खाली उतरत विहीर खोदत नेली.
आवश्यक वस्तू कायद्याची विषवल्ली मुळातून उखडा, 'किसानपुत्र'ची मागणी
म्हणून सरकारी विहिर मिळाली नाही
रामदास पिलावन यांच्याकडे वडिलोपार्जित 8 एकर जमीन दोन्ही भावात शेतीची समान वाटणी झाली. मात्र, ती कागदोपत्री नोंद नसल्याने त्यांना सरकारी योजनेमधून विहीर योजना भेटू शकली नाही. अशावेळी त्यांनी कोरडवाहू शेतात अल्प उत्पन्न यायचे. या काळात ते कधी नाउमेद झाले नाही, ध्यास घेऊन ते जगले. आज विहीर असल्याने समाधान आहे, असे तुळजा पिलावन यांनी सांगितले. विहीर खोदून रामदास पिलावन थांबले नाही. त्यांनी शेतातील दगड धोंडे वेचून काढले आणि शेताच्या काठावर याच दगडांच्या साहाय्याने दगडीबांध तयार करून शेतातील माती वाहून जाणार नाही याची काळजी घेतली. आज त्यांची मेहनत जिद्द चिकाटीने गावकरी कौतुक करत आहे. जिद्द चिकाटी असली की कुठलेही कार्य साध्य होऊ शकते हे पिलावन दाम्पत्याने करून दाखविले. आज त्यांच्या सकारात्मक कार्याची पंचक्रोशीत चर्चा आहे.
Cyclone Nisarga | चक्रीवादळामुळे रायगडच्या धामणी गावात पोल्ट्री व्यवसाय उद्ध्वस्त