धुळे : धुळे जिल्ह्यात 2017 च्या तुलनेत 2021 मध्ये हृदयविकाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या तब्बल अडीच पट वाढल्याची धक्कादायक माहिती शासकीय अहवालात समोर आली आहे. बदललेलं राहणीमान, स्थूल जीवनशैली ही हृदय रोगास कारणीभूत आहेतच, मात्र त्यासोबत कोरोना हे देखील एक त्यापैकी प्रमुख कारण असल्याची माहिती हृदय रोगतज्ज्ञ डॉक्टर यतीन वाघ यांनी दिली आहे. 

धुळे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात हृदयरोगामुळे 3 हजार 829 जणांचा मृत्यू झाला असून यात तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आलं आहे. धुळे जिल्ह्यात  2017 पासून हृदय रोगाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. जिल्ह्यात 2021 मध्ये 550 पुरुष तर 371 महिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचं शासकीय अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हृदयरोगामुळे मृत्यू होण्यास इतर कारणांसोबत कोरोना देखील महत्त्वाचं कारण असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.

वर्ष       मृत्यू 

2017    624

2018    748

2019    772

2020    764 

2021    921 

2017 च्या तुलनेत 2021 मध्ये धुळे जिल्ह्यात हृदयरोगामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत अडीच पटीने झालेली वाढ ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. पोस्ट कोविड, कामाचा वाढता तणाव, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनता, तेलकट पदार्थांचे जास्त सेवन, मीठ, मांसाहारी पदार्थ खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. तरुणांना हृदयरोगाचा विकार जडण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. छातीत थोडेफार दुखणे, अचानक शारीरिक बदल, रक्तदाब, मधुमेह असेल त्याकडे दुर्लक्ष करु नये. हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी योग्य पोषण आहार, नियमित आरोग्य तपासणी, मोबाईल फोन, टीव्ही यामध्ये जास्त वेळ न घालवणं तसंच मैदानावर व्यायाम करणं यामुळे हृदयरोगाचा धोका टळण्याची शक्यता जास्त असते, अशी माहिती हृदय रोगतज्ज्ञ डॉक्टर यतीन वाघ यांनी दिली.

हेही वाचा