Health Tips : बहुतेक लोकांना हे माहित आहे की, आहारात मिठाचे प्रमाण कमी केले पाहिजे. शतकानुशतके अन्न जतन करण्यासाठी मीठ (Salt) वापरला जात आहे. मीठ अन्नपदार्थातून ओलावा शोषून घेते, जे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंधित करते. जेवणात मीठ आवश्यक मानले जाते आणि त्यामुळे पदार्थांची चवही वाढते. मीठ हे सोडियम आणि क्लोराईडचे बनलेले रासायनिक संयुग आहे आणि आपण ते आपण आपल्या दररोजच्या आहारात वापरतो. या दोन घटकांपैकी सोडियम हा एक घटक आहे, ज्याबद्दल आपल्याला काळजी करण्याची गरज आहे.


सोडियमचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?


जास्त सोडियम वापरताना मुख्य समस्या म्हणजे उच्च रक्तदाबाचा धोका. उच्च रक्तदाब हा हृदयविकार आणि स्ट्रोकला निमंत्रण देणारा आहे. अनेक गंभीर आजार आणि मृत्यूचे हे प्रमुख कारण आहे. उच्च रक्तदाब हे किडनीच्या आजाराचे देखील कारण आहे. शरीरातील द्रव आणि सोडियम पातळी नियंत्रित करण्यासाठी शारीरिक बदल होत असतात. अशावेळी शरीरात सोडियमच्या पातळीचे नियंत्रण राखणे देखील आवश्यक आहे. कारण, सोडियम आपल्या शरीरातील सर्व पेशींच्या पडद्यावर परिणाम करतो. जेव्हा, आपण जास्त प्रमाणात मीठ खातो, तेव्हा ते रक्तातील सोडियमचे प्रमाण वाढवते.


सोडियमची पातळी संतुलित ठेवण्यासाठी शरीर रक्तामध्ये अधिक द्रवपदार्थ घेऊन प्रतिसाद देते. तरी, द्रव प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर दबाव वाढतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयाचे काम अधिक कठीण होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढण्यासह हृदय व रक्तवाहिन्यांचे रोग होऊ शकतात.


ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी मीठ कमी खावे!


काही गटातील लोक इतरांपेक्षा जास्त मीठयुक्त आहारामुळे जास्त प्रभावित होतात. हे लोक ‘मीठ-संवेदनशील’ असल्याचे म्हटले जाते आणि मिठाच्या वापरामुळे उच्च रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. आपल्या रक्तदाबाबद्दल जागरुक असणे महत्त्वाचे आहे. 120/80च्या खाली रक्तदाब चांगला आहे. जर, रीडिंग 140/90 पेक्षा जास्त असेल, तर रक्तदाब उच्च मानला जातो. हृदयविकार, मधुमेह किंवा किडनीचे आजार यासारखे इतर जोखमीचे आजार असल्यास धोका अधिक वाढतो.


रक्तदाब कमी करण्यासाठी मीठ कमी करणे गरजेचे!


रक्तदाब कमी करण्यासाठी आहारातील मीठ कमी करणे ही एक चांगली योजना आहे. यासाठी प्रक्रिया केलेले आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड केलेले पदार्थ खाणे टाळा. आहारात फळे आणि भाज्यांचे दररोजचे सेवन वाढवणे देखील तुमचा रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, कारण त्यात पोटॅशियम असते, जे रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करते. शारीरिक क्रियाकलाप वाढवणे, धूम्रपान बंद करणे, वजन संतुलित राखणे आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे देखील निरोगी रक्तदाब राखण्यास मदत करेल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.