पालघर : पालघरच्या आरोग्य पथकातील कोरोना उपचार केंद्रामध्ये उपचार घेत असलेला आरोपी पोलिसांचा कडक पहारा असतानाही त्यांच्या हातातून निसटून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पालघर पोलिसांच्या पहाऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला हा आरोपी गोमांस तस्कर प्रकरणात सहभागी होता. काही दिवसांपूर्वी गोमांस आणि काही जनावरे बेकायदा पद्धतीने वाहतूक केल्याप्रकरणी या आरोपीला मनोर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला काही दिवस पोलिस कोठडी मिळाली. केळवे पोलिसांनी पुढील तपासासाठी कोठडी मागण्याअगोदर आरोपीला कोरोना निष्पन्न झाल्यामुळे त्याची न्यायालयीन कोठडी घेण्यात आली. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पालघरच्या जे जे आरोग्य पथकात उभारलेल्या कोरोना उपचार केंद्रामध्ये दाखल केले गेले. त्याच्यासोबत त्याचे आणखीन दोन सह आरोपीही येथे उपचार घेत आहेत. हे आरोपी उपचार घेत असल्यामुळे या उपचार केंद्रावर आरोपीवर पाळत ठेवण्यासाठी तीन ते चार पोलीस तैनात केले होते. मात्र पोलिसांची कडक सुरक्षा फळी भेदून त्यांना गुंगारा देऊन या आरोपीने पलायन केल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत उलट सुलट प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
आज (रविवार) पहाटेच्या सुमारास त्याने पळ काढला तेव्हा तेथे तैनात केलेले पोलीस काय करत होते? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. समाज माध्यमांवर ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने तेथेही पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी पथके स्थापन करून त्याचा शोध घ्यायला मोहीम सुरुवात केली आहे. आता हा फरार आरोपी पोलिसांच्या हाताला लागतो का हे पहावे लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Maharashtra School : राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
- Barshi Scam : बार्शीतील 'फटे स्कॅम' चा उलगडा करण्यासाठी प्रशासन सज्ज, विशेष तपास पथक स्थापन
- Goa Election 2022 : दिल्लीप्रमाणे गोव्यात आरोग्य, शिक्षण व्यवस्था बदलणार, वीजही मोफत देणार : अरविंद केजरीवाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha