मुंबई : राज्यात वादग्रस्त ठरलेल्या आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी उमेदवारांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. तर दुसरीकडे पूर्ण आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी एमपीएससी समन्वय समितीकडून सोशल मीडियावर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.  24 ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी आणि नियुक्तीची प्रतीक्षा आहे. आरोग्य विभागाची परीक्षा होऊन दोन महिने झाले आहेत. याचदरम्यान या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात पोलिसांकडून चौकशीसुद्धा सुरू आहे.


आरोग्य विभागाच्या सरसकट परीक्षा पुन्हा घ्याव्यात, अशी मागणी होत असताना 52 पैकी ज्या संवर्गाच्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याचं आढळलं आहे, त्याची चौकशी सुरू ठेवावी. तसेच  इतर संवर्गात जिथे कुठे गैरप्रकार आढळून आला नाही, त्या संवर्गाची गुणवत्ता यादी तातडीने जाहीर करून नियुक्तीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्यातील उमेदवारांकडून केली जाते आहे. तर दुसरीकडे असे अनेक उमेदवार आहेत, ज्यांनी या आरोग्य भरती परीक्षेवर आक्षेप घेतला आहे. या परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द करावी, अशी मागणी केली जात आहे. 


एमपीएससी समन्वय समितीने आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी ही संपूर्ण परीक्षा रद्द करावी यासाठी  #आरोग्य परीक्षा रद्द करा ही मोहीम सोशल मीडियाच्या माध्यमातून राबवली आहे. आता एकीकडे आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी काही उमेदवार करत आहेत. तर दुसरीकडे पूर्ण आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी एमपीएससी समन्वय समितीकडून सोशल मीडियावर विशेष मोहीम राबवली जातेय. त्यामुळे आता आरोग्य विभागाच्या परीक्षा संदर्भात राज्य सरकार नेमका काय निर्णय घेतो की अजूनही उमेदवारांना प्रतीक्षेत राहावे लागते, हे पहावे लागणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: