सांगली : वाळव्यात डॉक्टर दाम्पत्याकडून बेकायदा सावकारी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. बेकायदा सावकारी करणाऱ्या या डॉक्टर दाम्पत्याला आष्टा पोलिसांनी अटक केली आहे.


अवैध सावकारी करणारे हे डॉक्टर दाम्पत्य वाळवा गावातील असून डॉ. अनिल चंद्रकांत खुंटाळे आणि डॉ. रुपाली अनिल खुंटाळे अशी या दोघांची नावे आहेत. दोघांवरही आष्टा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 506 आणि कलम 34 अन्वये महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39, 45 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.


सांगली जिल्ह्यातील बेकायदेशीर सावकारी विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिले होते. त्यानुसार बेकायदा सावकारी करणाऱ्या वाळवा गावातील डॉक्टर दाम्पत्य डॉ. अनिल चंद्रकांत खुंटाळे व त्यांची पत्नी डॉ. रुपाली अनिल खुंटाळे यांच्यावर आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


वाळवा गावात राहणारे संजय बंडा नायकवडी यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेवून डॉ. रुपाली खुंटाळे आणि डॉ.अनिल खुंटाळे यांनी त्याची दिशाभूल, फसवणूक करुन व्यवहारापोटी व्याज व मुद्दलापेक्षा 4 लाख 50 हजार जास्त घेतले. शिवाय 5 टक्के व्याजाने आणखी 3 लाख 50 हजार रूपयांची मागणी केली. ही रक्कम नाही दिल्यास तुझ्यावर केस टाकू व तुझ्या कुटूंबाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी दिल्याचे नायकवडी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 


दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुतार करत आहेत. तरी खासगी सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या नागरिकांनी कोणालाही न घाबरता आष्टा पोलीस स्टेशनला तक्रार द्याव्यात. संबधीत आरोपी सावकारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी आवाहन केले आहे.


महत्वाच्या बातम्या