मुंबई : राज्यातील शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने केले जाणार आहे. पाच सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व खाजगी, सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळातील शिक्षकांचे लसीकरण करण्याबाबतचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने काढले आहेत. राज्यात शाळा सुरू करण्याबाबत सध्या विचार सुरू आहे, सोबतच शिक्षक दिनापूर्वी सर्व राज्यातील शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांना दिले होते.
त्या अनुषंगाने 5 सप्टेंबरपर्यंत राज्यातील शिक्षकांचे प्राध्यानक्रमाने लसीकरण करण्याबाबत सर्व महापालिका, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्यात. त्यामुळे आता प्रत्येक गावात, शहरात आणि महापालिका हद्दीत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सरकारी तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविड 19 लसीकरण करण्याच्या सूचना आहेत. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने काही सूचना केल्या आहेत.
आरोग्य विभागाने नेमक्या काय सूचना केल्या
जिल्हा व मनपा कार्यक्षेत्रातील आरोग्य विभाग व शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने सरकारी व खाजगी शाळामधील शालेय शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण करावे.
आपल्या जिल्हा व मनपा कार्यक्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळेतील कोविड 19 लसीकरण न झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लाभार्थी यांच्या यादी शालेय शिक्षण विभाग यांच्याकडून घेण्यात यावी.
अपेक्षित लाभार्थी संख्येनुसार आपल्या स्तरावर कोविड 19 लसीकरणाचे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात यावे,
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविङ लसीकरण हे प्राधान्याने सध्या सुरु असलेल्या कोविड लसीकरण केंद्रांवर करण्यात यावे.
आवश्यकता भासल्यास सदर लाभार्थ्यांसाठी वेगळे CVCs, Plan करण्यात येवून लसीकरण करण्यात यावे..
लसीकरणाबद्दलची संपूर्ण माहिती CoWIN पोर्टलवर नोंद करण्यात यावी.
आपल्या जिल्हा व मनपा कार्यक्षेत्रात लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची माहिती (प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी) आपल्या स्तरावर अचूकपणे संकलित करण्यात यावी.