मुंबई : कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर  राज्यातील मंदिरं बऱ्याच काळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडावीत या मागणीसाठी आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून आज  राज्यभरात ठिकठिकाणी शंखनाद आंदोलन करत मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे.  पुण्यात कसबा गणपती मंदिरासमोर भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.  


चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेनेनाल दोन साथीदार असे मिळाले त्यांना देवावर विश्वास नाहीय.  अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी असं करावं लागतंय.  खुर्ची टिकवण्यासाठी आणि दोन्ही पक्षांना खुश करण्यासाठी सरकार मंदिरं खुली करत नाहीयत. लॉकडाऊनचे नियम सर्वांना सारखे पाहिजेत.  दारू घरी पोहचवतात.  सोबत असणाऱ्या दोन्ही पक्षांना खुश करण्यासाठी मंदिरं खुली केली जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला. 


हिंदू विरोधी सरकार,आम्ही दहीहंडी साजरी करणार - राम कदम
मुंबईत आंदोलन करताना राम कदम म्हणाले की, हे हिंदू विरोधी सरकार आहे त्यामुळे मंदिरं उघडली जात नाहीत. विशेष म्हणजे दारूच्या दुकानांना परवानगी आहे. आम्ही गर्दी करा म्हणत नाहीत. जे नियम दारूचे दुकानं उघडण्यासाठी लावले आहेत त्यांना परवानगी आहे. मग मंदिरांबाबत देखील नियमावली करून परवानगी द्या. दोन डोस पूर्ण झालेत त्यांना तरी परवानगी द्या. दुसऱ्या धर्माच्या लोकांनी परवानगी मागितली तर रात्री मंत्रालय उघडून परवानगी दिली जाते. पारंपरिक पद्धतिने दहीहंडी साजरी करण्यावर देखील यांनी बंदी घातली आहे. मात्र उद्या आम्ही दहीहंडी साजरी करणार आहोत. हिंदू धर्म सडका म्हणणाऱ्यांना हे अटक करत नाहीत आणि मंदिर उघडण्यासाठी देखील हे परवानगी देत नाहीत. हिंदू विरोधी हे सरकार आहे.  सामाजिक अंतर राखून, नियमांसहित ठराविक लोकांना तरी परवानगी द्या. शिर्डी , सिद्धिविनायक यांबाबत नियम करून तरी परवानगी द्या. लोकल प्रवासासाठी जे नियम लावले आहेत ते लावा आणि परवानगी द्या, हिंदूविरोधी काँग्रेस सोबत तुम्ही बसला आहात त्यामुळे तूम्ही परवानगी देत नाहीत. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी तुमची हतबलता आम्हाला पाहिला मिळत आहे, असं राम कदम म्हणाले. 


कोल्हापूर - मंदिर उघडण्यासाठी कोल्हापुरात भाजपनं आंदोलन केलं. अंबाबाई मंदिराजवळ भाजपनं हे आंदोलन केलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घंटानाद करत मंदिर उघडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. 


तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरा समोर आज भाजपाच्या वतीने शंखनाद आंदोलन केले. मुख्य महाद्वार, शहाजी महाद्वारासमोर भाजपने काळी गुढी उभारली होती. भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. रा 


सोलापुरात भाजप आमदार माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले. शहरातील बाळीवेस परिसरात असलेल्या मल्लिकार्जुन मंदिरासमोर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. टाळ मृदंग आणि हातात पोस्टर घेऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी भाजपच्या 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान यावेळी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सरकारवर निशाणा साधला. राज्यात बार सुरू आहेत, मात्र भक्त परमेश्वराच्या दर्शनाला आसूसलेले असताना मंदिर उघडे केले जात नाहीयेत. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने हिंदुत्वाचा मुद्दा गुंडाळायचा अशी अट ठेवल्याने शिवसेना मंदिर उघडत नाहीये अशी टीका आमदार सुभाष देशमुख यांनी केली. 

सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही, बीडमध्ये भाजपने उघडले मंदिर..


सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही, बिअर बार हॉटेल मॉल सुरू केले. मग मंदिर बंद का? असा सवाल करत आज बीड भारतीय जनता पार्टीच्या वतीने, मंदिर उघडण्यात यावी यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र बेलेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश केला. तसेच आजपासून सरकारचे नियम पाळणार नाही आजपासून भक्तांना दर्शनासाठी हे मंदिर खुले राहील, असा निर्णय घेण्यात आला. उघडलेले मंदिर बंद करू देणार नाही, असा पवित्रा देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आला.
सरकार आमच्या श्रद्धेच्या आड येऊ शकत नाही. पवित्र  श्रावण महिन्यात मंदिर बंद होते, आता उघडलेले मंदिर बंद करू देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.


शिर्डी : भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हार भगवतीपूर येथे भगवतीमाता मंदिरासमोर आंदोलन केलं. मंदिर उघडण्यासाठी भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी मंदिर लवकरात लवकर उघडावीत अशी मागणी केलीय.