जालना : कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवाला (Ganesh Utsav 2021 )सुरूवात होणार असून सरकार, आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. कोकणातील गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी, चाकरमान्यांचं आगमन या साऱ्या पार्श्वभूमीवर आता कोकणातील सर्वच जिल्हा प्रशासन सतर्क झाली आहेत. मात्र गणेश उत्सवाच्या काळात चाकरमान्यांना कोरोनाच्या निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. जनहितासाठी शासनाच्या या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. सर्व नियम विचार करूनच घेतले जातात. त्यामुळे यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन टोपे यांनी केलं आहे. कोकणात येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर आणि कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस अनिवार्य करण्यात आले आहेत. दरम्यान प्रशासनाच्या या निर्णयाविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे गणेशउत्सवात कोरोनाच्या या निर्बंधातून सूट मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. 

  
रात्रीच्या संचारबंदीचा अद्याप निर्णय नाही


दरम्यान रात्रीच्या संचारबंदी विषयी केंद्राच्या सूचनेच्या निर्णयावर चर्चा होत असून या बाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नसून टास्क फोर्स सोबत चर्चा करून यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.  


...तर जिल्हा प्रवेशासाठी RTPCR चाचणी बंधनकारक; गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात नियमावली


रत्नागिरी जिल्हा प्रशासन सतर्क


कोकणातील गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी, चाकरमान्यांचं आगमन या साऱ्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली गेली आहे. या नियमावलीनुसार दोन डोस पूर्ण न झालेल्या व्यक्तिला आता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रवेश करताना किमान 72 तासापूर्वीचे रिपोर्ट दाखवणे आता बंधनकारक आहे. तसेच रिपोर्ट नसल्यास जिल्हा प्रवेशापूर्वी सदर व्यक्तिची चाचणी केली जाईल. यावेळी चाचणी पॉझिटीव्ह आल्यास सदर व्यक्तिला संस्थात्मक विलगीकरणात पाठवले जाईल. पण, दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तिला मात्र यामधून सुट मिळाली आहे. त्यामुळे दोन डोस पूर्ण झालेल्या असल्यास जिल्ह्यात कोणत्याही चाचणीविना प्रवेश मिळणार आहे. 


आणखी काय आहेत नियमावली


महत्त्वाची बाब म्हणजे उत्सवकाळात कोरोना नियमांचं पालन करावे लागणार आहे. भजन, आरती, किर्तन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनानं केलं आहे. गणेशमूर्ती ही शासनाने नेमून दिलेल्या मानकाप्रमाणे ठेवावी लागणार आहे. गणेश विसर्जन घराजवळच करावे. शक्य असल्यास हौद, कृत्रिम तलावांचा वापर करावा. गर्दी टाळण्यासाठी नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या मार्फत मूर्ती संकलन करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात यावी. गणेश प्रसादामध्ये सुका मेवा, पूर्ण फळ यांचा समावेश असावा असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.