मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
लातूर, बुलडाणा, परभणी, वाशिम, जालना, बीड, वर्धा याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
औरंगाबाद : राज्यावर असलेलं दुष्काळाचं सावट आणि पिण्याचा पाण्याचा, तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चाललं आहे. या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सरकारनं तातडीनं पावलं उचलावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या मागण्यांसाठी मराठवाड्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली. लातूर, बुलडाणा, परभणी, वाशिम, जालना, बीड, वर्धा याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
लातूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं आज लातूर जिल्ह्यातील करकट्टा येथे रास्ता रोको करण्यात आला. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी हा रास्तारोको करण्यात आला. या रास्तारोकोमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. चारा छावण्या सुरु कराव्यात, लाईट बिल आणि कर्ज माफ करावं, ऊसाच्या झालेल्या नुकसानाचे एकरी पन्नास हजार नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
वाशिम स्वाभिमानीकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद वाशिममध्येही पाहायला मिळाले. वाशिममध्ये अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गवर स्वाभिमानी संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
परभणी परभणी जिल्ह्यांतील अनेक भागांमध्येही स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी आंदोलन केलं. दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी पन्नास हजार मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानीकडून परभणीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
जालना जालना जिल्ह्यातील जाफराबादेतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. दुष्काळी स्थितीमुळे कापूस, सोयाबिन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत तातडीनं करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
बीड मराठवाडात दुष्काळ जाहीर करा, पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत करा ,शेतकरी कर्ज माफी तात्काळ करा, वीजबिल माफ करा इत्यादी मागण्यांसाठी बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव फाटा या राष्ट्रीय महामार्ग 222 वर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. या आंदोलनामुळे जवळपास एक तास माजलगावहून कल्याणकडे जाणारी वाहतूक ठप्प होती.