Maharashtra Assembly Winter Session : विधिमंडळाच्या अधिवेशनात आतापर्यंत साडेतीनशे सदस्यांचे (MLA) निलंबन करण्यात आले आहे. निलंबित झालेले पहिले सदस्य विदर्भवीर जांबूवंतराव धोटे होते. गोंधळ, गैरवर्तणूक, राजदंड पळवणे, कागदपत्र फाडणे, मुख्यमंत्र्यांना इजा करण्याचा प्रयत्न करणे, सभागृहात प्रेतयात्रा काढणे, विषारी औषधी आणि केरोसिन (रॉकेल) अंगावर घेणे, आदी प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली होती.
विधिमंडळातील प्राप्त नोंदीनुसार सर्वप्रथम 12 ऑगस्ट, 1964 ला जांबूवंतराव धोटे यांच्यावर निलंबनाची कारवाई (Action of suspension on MLA) करण्यात आली होती. धोटे यांनी माईक बंद असल्याच्या कारणावरुन माईक तोडला होता. पेपर वेट फेकून मारला होता. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व कायमचे रद्द करण्यात आले होते. 2021 मध्ये पिठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने भाजपच्या 92 सदस्यांचे निलंबन झाले होते, तर यंदा ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अध्यक्षांविषयी अपशब्द बोलल्याने करण्यात निलंबन आले.
'या' प्रश्नावरुन सर्वाधिक सदस्यांचे निलंबन
महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावादाच्या प्रश्नावरुन सर्वाधिक सदस्यांवर निलंबनाची कारवाई झाली. ऑगस्ट, 1966च्या अधिवेशनात 20 सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरच्या वर्षात एकाच अधिवेशनात दोन वेळा 43-43 सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
दुष्काळ आणि टंचाईच्या मुद्यावरुनही निलंबन
22 मार्च, 1973 ला दुष्काळ व टंचाईच्या मुद्यावरुन झालेल्या गोंधळामुळे तब्बत 27 सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. 1974 मध्ये याच कारणावरुन झालेल्या गोंधळातून 17 आमदार आणि 1975 मध्येही 1 आमदार निलंबित झाले होते, तर 1985 ला शासनाने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी योजना बंद केल्याने 12 आमदारांचे निलंबन झाले होते.
आमदारांनी काढली होती प्रेतयात्रा
2009 साली शपथविधी कार्यक्रमात अनुचित वर्तन केल्याप्रकरणी मनसेचे नऊ आमदार निलंबित झाले होते. तर रमाई आंबेडकरनगरातील गोळीबारप्रकरणी सभागृहात प्रेतयात्रा काढल्यामुळे समाजवादी व भाकपचे पाच सदस्य निलंबित झाले होते.
मुख्यमंत्र्यांना शारीरिक इजा केल्याप्रकरणी निलंबन
1991च्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना शारीरिक इजा केल्याप्रकरणी सेनेच्या 3 आमदारांना निलंबित केले होते, तर 1987च्या अधिवेशनात अध्यक्षांची परवानगी न घेता, फलक झळकवून गैरवर्तणूक केल्याप्रकरणी छगन भुजबळ यांना निलंबित केले होते. अध्यक्षांच्या टेबलावर हात आपटून कामकाजात अडथळा आणल्याने 1993 मध्ये 6 आमदार निलंबित केले होते. राजदंड पळवून नेल्याने सभागृहात अंगावर केरोसिन ओतण्याचा प्रयत्न केल्याने 2005 मध्ये गुलाबराव गावंडे यांना निलंबित केले होते. याच वर्षात अध्यक्षाच्या दालनात उपाध्यक्षांना शिवीगाळ केल्याने 3 सदस्यांचे निलंबन झाले होते. 2006 मध्ये अध्यक्षांना पुस्तिका फेकून मारल्यामुळे 6 आमदारांचे निलंबन झाले होते. 2010 मध्ये राजदंड पळवल्याने संजय राठोड यांचे निलंबन झाले होते. राज्यपालांना धक्काबुक्की केल्याने 5 आमदारांचे निलंबन 2014 मध्ये झाले होते.
ही बातमी देखील वाचा...