Nashik Crime : नाशिक (Nashik) प्रख्यात डॉक्टर प्राची पवार (Prachi Pawar) यांच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच महिला डॉक्टरवर हल्ल्याची आणखी एक धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे. एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला (Attack) केला आहे. या घटनेत महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली आहे. 


काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ अशी ओळख असलेल्या डॉक्टर प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या हल्ल्यातील संशयित अद्याप फरार असतांना डॉक्टरवरील हल्ल्याची घटना समोर आली आहे. गंगापूर रोडवरील निम्स (Nims Hospital) या खाजगी रुग्णालयातील रविवारी रात्रीची घटना असून काल याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. 
या प्रकरणी गंगापूर पोलिसांकडून वॉर्डबॉय अनिकेत डोंगरेला अटक करण्यात आली आहे. 


सुखदेव आव्हाड यांनी गंगापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर रोडवरील निम्स हॉस्पिटलमध्ये डॉ. सोनल अविनाश दराडे या काम करतात. दरम्यान  निम्स् हॉस्पिटल येथे काम करणाऱ्या संशयित अनिकेत डोंगरे नावाच्या वाँर्ड बाँयने कात्रीने वार केले. निमसे हॉस्पिटलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दवाखान्यातील कात्रीने डॉ. आव्हाड यांच्या मानेवर उजव्या बाजुस व पोटात उजव्या बाजुस वार करून तीला गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संशयित वार्ड बॉय हा गेल्या काही महिन्यापासून निम्स हॉस्पिटलमध्ये काम करत असून येथील एका महिला नर्ससोबत त्याचे मैत्रीचे संबंध आहेत. रुग्णालयातच काम करणाऱ्या वॉर्ड बॉयच्या मैत्रिणीला संबंधित महिला डॉक्टर रागवत असल्याच्या किरकोळ कारणावरून कृत्य केल्याचे समोर आले आहे. डॉ. आव्हाड संशयित वार्डबॉयच्या मैत्रिणीवर वॉच ठेवून असल्याने शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या कात्रीने मानेवर आणि पोटावर सपासप वार केल्याने डॉक्टर गंभीर जखमी झाली आहे. संशयित डोंगरेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अद्याप डॉक्टर पवार यांच्यावर हल्ले करणारे संशयित फरार असताना आता पुन्हा डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना घडल्याने नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. 


डॉ. पवार हल्ल्यात संशयित फरारच.. 
नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवर्धन परिसरात डॉ. प्राची पवार आपल्या फार्म हाऊसवर इनोव्हा या चारचाकीने गेल्या होत्या. यावेळी फार्म हाऊसच्या प्रवेशद्वारावर दुचाकी लावलेली त्यांना दिसली. दुचाकी बाजूला घ्या असं त्यांनी सांगितलं. परंतु याचा राग आल्याने अज्ञात तीन ते चार जणांच्या टोळक्यातील एकाने चालकाच्या सीटवर बसलेल्या प्राची यांच्या हातावर दोन ते तीन ठिकाणी धारदार शस्त्राने वार केले. डॉ. प्राची पवार यांनी तात्काळ गाडीच्या काचा लावताच टोळक्याने घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्याला आठ दिवस होत नाहीत तोच आज पुन्हा हल्ल्याची घटना घडली.