नवी दिल्ली: पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्रतेने बोलतात, माझी त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सिंचन घोटाळ्याची (Irrigation Scam) आणि एका बँकेतील घोटाळ्याची त्यांनी चौकशी करावी.. ही मागणी केलीय खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आणि तीही संसदेत. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याची चर्चा मात्र आता सुरू आहे. 


Supriya Sule On Irrigation Scam : काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 


सुप्रिया सुळे या संसदेत बोलताना म्हणाल्या की, तुम्ही भ्रष्टाचाराविरोधात कोणतीही चौकशी लावा. आम्ही त्याला पाठिंबा देऊ. पंतप्रधानांनी (Narendra Modi) बोलताना म्हटलं होतं की राष्ट्रवादी ही नॅशनॅलिस्ट करप्ट पार्टी आहे. त्यांनी त्या वेळी सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याचा संदर्भ दिला होता. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की पंतप्रधानांची इच्छा पूर्ण करावी. या प्रकरणांची चौकशी करावी. 


सुप्रिया सुळे बोलत असताना समोरच्या बाकावरून काहीतरी कुजबूज झाली. भाई के घोटाले का नाम लिया अशा आशयाची कुजबूज झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यालाही उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की संसदेत बसलेले माझे 800 भाऊ आहेत, एकच आहे असं नाही. 


Narendra Modi On Irrigation Scam : काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?


काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, "राष्ट्रवादीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यावर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खोदकाम घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची यादी मोठी आहे."


Ajit Pawar : अजित पवार सत्तेत सामील


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याचा आरोप केला होता त्या आरोपांशी भाजपनेच अजित पवार यांचे नाव जोडलं होतं. मोदींनी आरोप केल्यानंतर काहीच दिवसात अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील एक गट घेऊन भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाले. 


आता खासदार सुप्रिया सुळे यांनी याच सिंचन घोटाळ्याची आणि राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याची पंतप्रधानांनी चौकशी करावी अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यासाठी पाठिंबा देईल असंही म्हटलं. 


भाजपच्या भूमिकेची संसदेत गोची करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी ही विनंती केल्याची राजकीय चर्चा आहे. 


ही बातमी वाचा: