नाशिक : स्पर्धा परीक्षेच्या (Competitive Exam) माध्यमातून आज अनेक तरुण तरुणी मेहनतीच्या जोरावर यश संपादन करत आहेत. यात तरुण कुठलाही क्लास न लावता सेल्फ स्टडीच्या माध्यमातून परीक्षा उत्तीर्ण होत आहेत. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मंत्रालयीन लिपिक पदाची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. यात नाशिकच्या सिन्नर (Nashik) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या ज्योती आव्हाड यांनी यश संपादन केले आहे. शिवाय भटक्या विमुक्त जमाती गटातून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मानही मिळवला आहे. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC Exam) वेळोवेळी अनेक स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. या स्पर्धा परीक्षांसाठी जीवाचं रान करून अनेक तरुण तरुणी परीक्षा देत असतात. मात्र काहींना एक दोन वर्षात यश मिळते, तर काही तरुणांना अनेक वर्ष अभ्यास करूनही हाती काहीच लागत नाही. मात्र निराश न होता यशाचा पल्ला गाठत असतात. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मंत्रालयीन लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी कुटुंबातील ज्योती अंबादास आव्हाड (Jyoti Avhad) हिने घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या ज्योतीने भटक्या विमुक्त जमाती गटातून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. 


सिन्नर (Sinner News) तालुक्यातील चापडगाव येथील परिसर डोंगराळ असून बहुतांश कुटुंब शेती व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करतात. ज्योतीचे वडील अंबादास आव्हाड हे शेतकरी तर आई गृहिणी आहेत. ज्योतीचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत घेऊन दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण जवळच असलेल्या दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पुर्ण केले. त्यानंतर बारावी व पदवीचे शिक्षण सिन्नर येथील जीएमडी महाविद्यालयात घेतले. कला शाखेत शेवटच्या वर्षांत पदवीचे शिक्षण घेत असतानाच ज्योतीने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात (YCMOU) प्रवेश घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी सुरु केली होती. त्यानंतर तब्बल चार वर्षे ज्योती यांनी कोणताही क्लास न लावता स्वअध्ययनाच्या जोरावर परिक्षेची तयारी केली. सन 2022 मध्ये नोव्हेंबर महिन्यात लोकसेवा आयोगाची जाहिरात आल्यानंतर पहिली परिक्षा दिली. त्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ज्योती यांनी मुख्य परीक्षेची तयारी करत यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुख्य परिक्षाद देखील उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे ज्योती यांनी भटक्या विमुक्त जमाती गटातून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. 



दरम्यान या निकालानंतर ज्योती आव्हाड यांची मुंबई मंत्रालयात लिपिक म्ह्णून निवड झाली आहे, ज्याचे नवीन नाव महसूल सहाय्यक म्हणून बदलण्यात आले आहे. याविषयी बोलताना ज्योती म्हणाल्या की, पदवीचे शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. आमच्या परिसरातील एक मुलगी एआरटीओ या परीक्षेत पस झाल्यानंतर मलाही कुठेतरी वाटलं आपणही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होऊ, त्यानुसार अभ्यासाला सुरवात केली. मात्र क्लास लावणे शक्य झाले नाही. या दरम्यान नाशिकरोड येथील अटल ज्ञान संकुल येथे अभ्यास केला. मात्र स्वतःवर विश्वास होता, त्यामुळे सेल्फ स्टडीवर भर दिला. यातूनच यश संपादन करू शकल्याचे त्या म्हणाल्या. जिद्द, चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एका युवतीने अवघड परिक्षेत यश साध्य केले आहे. डोंगराळ परिसरात राहणाऱ्या ज्योतीने स्पर्धा परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करुन इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. 


 तर यश नक्कीच पदरात पडते.. 


आईवडील शेती करतात. शिक्षणाच्या बाबतीत घरातून पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे या प्रवासात कुटुंबाची अनमोल साथ मिळाली. तसेच स्पर्धा परिक्षेच्या काळात तसेच विविध विषयांवर शिक्षकांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले. तसेच अभ्यास करत असताना अनेक नवनवे पैलू लक्षात येत गेले. यासाठी शिक्षकांसह अनेक मित्र मैत्रिणीचे मार्गदर्शन देखील मोलाचे ठरले. आजही ग्रामीण भागातील अनेक तरुण तरुणी मोठ्या जिद्दीने परिस्थितीचा आव न आणता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात. यात सातत्य असणे आवश्यक असतं. म्हणूनच स्पर्धा परिक्षेची तयारी करताना स्वअध्ययन, जिद्द, काहीतरी करण्याची उमेद बाळगून अभ्यास करावा, यश नक्कीच पदरात पडते, असा विश्वास ज्योती आव्हाड यांनी व्यक्त केला. 


 


इतर महत्वाची बातमी : 


MPSC Success Story : कुठलाही क्लास न लावता निफाडची गृहिणी बनली क्लास टू अधिकारी; संसार सांभाळत मिळवलं यश!