पुणे : दुष्काळाचा मोठा फटका आगामी गळीत हंगामात साखर उद्योगाला बसणार आहे. ऊस लागवडी खालील क्षेत्र तीस टक्यांनी घटेल. तर, साखरेचे उत्पादन जवळपास निम्यावर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. चालू गळीत हंगाम नुकताच संपला आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी ही माहिती दिली.

चालू हंगामात राज्यात 11 लाख 62 हजार हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली होती. त्यातून 952 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होऊन 107 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

पुढील हंगामात मात्र ऊस लागवडीखाली 8 लाख 43 हजार हेक्टर क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. पावसाने ओढ दिल्यास हे क्षेत्र आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यातही मराठवाड्यात याचा मोठा परिणाम दिसेल. मराठवाड्यात आताच ऊस लागवड पन्नास टक्के कमी झाली आहे.

त्यामुळे साखर उत्पादनही घटणार आहे. आगामी हंगामात 65 लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज साखर आयुक्तांनी वर्तवला आहे.

चालू हंगामात एफआरपीची रक्कम 94 टक्के रक्कम देण्यात आली आहे. एफआरपी न देणाऱ्या 73 साखर कारखान्यांवर जप्तीची करण्यात आली आहे. राज्यात 195 खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी गाळप केले आहे.

ऊस कमी असल्याचा फटका साखर कारखादारांना बसणार असला तरी, शेतकऱ्यांची मात्र चांदी होणार आहे. ऊसाच्या कमतरतेमुळं शेतकऱ्यांच्या उसाला चांगले दर मिळतील, असेही गायकवाड यांनी सांगितले आहे.