मुंबई : राष्ट्रवादीचं कोणत्याही  पक्षात विलिनीकरण होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार, असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पक्षाच्या काँग्रेसमधील विलिनिकरणाच्या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांशी संवादही साधला.

लोकसभेच्या निकालाच्या चर्चा आता उगाळत बसू नका. पुढे विधानसभा आहे त्याकडे लक्ष द्या, असं म्हणत कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही अजित पवारांनी दिल्या आहेत. ईव्हीएम घोटाळ्याच्या नावाखाली कामं करणं सोडू नका, असं म्हणत कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला लागण्याचं आवाहनही केलं. लोक लोकसभेत वेगळा विचार करतात, विधानसभेत वेगळा विचार करतात. त्यामुळे आता चर्चा नको, कसून प्रयत्न करा असं म्हणत विधानसभेसाठी कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सूचनाही केल्या आहेत.


“ईव्हीएम मशिनबाबत सर्व प्रयत्न केले. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांच्यापर्यंत पोहोचून झालं. एका पक्षानं सांगितलं पुढच्या निवडणूकीत ईव्हिएम असेल तर आम्ही निवडणूक लढवणार नाही. पण, लोकशाहीत असं चालणार नाही. जेव्हा हरले तेव्हा ईव्हीएम मशिनचा घोटाळा आणि जेव्हा जिंकले तेव्हाही ईव्हीएम होतंच की.”, असं म्हणत ईव्हीएमवर खापर न फोडता लोकांपर्यंत पोहोचणं सोडू नका असं आवाहनही अजित पवारांनी केलं आहे.