मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शिवसेनेत अस्वस्थता असल्याचं चित्र आहे. अमित शाहांच्या बैठकीतील मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावरुन शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी चंद्रकांत पाटलांनी युतीच्या फॉर्म्युल्यावर  केलेल्या वक्तव्यानेही शिवसेनेत नाराजी होती.


भाजपच्या कोअर कमिटीची काल रविवारी दिल्लीत बैठक झाली. राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवर यावेळी मंथन करण्यात आलं. विधानसभेसाठी शिवसेनेसोबत युती राहणार आहे, मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच हवा असं वक्तव्य अमित शाहांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत विधानसभेला युती ही होणारच आहे. लोकसभेला मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी काम केलं. तसंच विधानसभेला भाजपचा मुख्यमंत्री बनण्यासाठी करायचं आहे. केवळ आपल्याच जागांवर नव्हे तर मित्रपक्षाच्या ही जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा, अशा सूचना अमित शाहांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याचं बोललं जात आहे.



दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला दिलेल्या 'अवजड' मंत्रिपदावरुनही शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी याचं खंडन केलं. सोबतच शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याची मागणीही केली होती.

चंद्रकांत पाटलांनी युतीच्या फॉर्मुल्यावर केलेल्या वक्तव्यावरुनही शिवसेना नाराज होती. आता अमित शाहांच्या कोअर कमिटीतील कानमंत्रामुळे त्यात भरच पडली आहे. दरम्यान कोल्हापुरात उद्धव ठाकरे म्हणाले होते की आमचं ठरलं आहे. त्यामुळे शिवसेनेचं नेमकं काय ठरलयं? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.