Mumbai Vaccination : केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिनांक 19 मे 2021 रोजी निर्गमित केलेल्या सुचनांनुसार, स्तनदा मातांनाही कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर थेट येऊन नोंदणी करणाऱ्या (वॉक इन) स्तनदा मातांना कोविड लस देण्यात येणार आहे. 


स्तनदा मातांना लस देताना योग्य त्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसुती झाल्याची दिनांक, स्थळ यांसह आवश्यक वैद्यकीय कागदपत्रं तसेच वैद्यकीय माहिती महिलांनी समवेत बाळगणे आवश्यक आहे. आठवड्याचे पहिले तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट येणाऱ्या विविध पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येते. त्यामध्ये आता स्तनदा मातांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट येणाऱ्या (वॉक इन) स्तनदा मातांचे लसीकरण केंद्रामध्ये जागेवरच नोंदणी करुन लागलीच त्यांना लस देण्यात येईल.


दरम्यान, गरोदर स्त्रियांना जर कोविड प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असेल, तर अशा गरोदर स्त्रियांना, त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या स्त्री रोग तज्ज्ञाने त्यांच्या शीर्षपत्रावर (लेटरहेड), कोविड लस देण्याबाबत तसेच लेखी प्रमाणपत्र देणे आवश्यक असेल. असे प्रमाणपत्र गरोदर स्त्रियांनी स्वतः स्त्री रोग तज्ज्ञांकडून प्राप्त केल्यानंतर कोविड लस घेण्याबाबत स्वतःचे संमतीपत्र देखील द्यावे लागेल. स्त्री रोग तज्ज्ञाचे प्रमाणपत्र आणि संमतीपत्र अशी दोन्ही कागदपत्रं लसीकरण केंद्रावर येताना सोबत आणावी आणि लसीकरण केंद्राकडे सुपूर्द करावी. त्यानुसार, त्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.


मुंबईतील रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर 


मुंबईत मागील 24 तासात 1,057 रुग्णांचे निदान झाले आहे. तर  1312 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6 लाख 53 हजार 998 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 334 दिवसांवर गेला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :