(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातील विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लेखी आश्वासन
राज्यातील विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 14 विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
मुंबई : राज्यातील 14 विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन आज स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या समवेत कृती समितीच्या पदाधिकार्यांची ऑनलाईन बैठक झाली. येत्या पंधरा दिवसात सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत शासन निर्णय न आल्यास 19 ऑक्टोबरपासून पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती समितीचे राज्य समन्वयक कैलास पाथ्रीकर यांनी दिली.
अंतिम वर्षाच्या परिक्षा तोंडावर आल्या असताना राज्यातील अकृषी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी आणि राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकतेर कर्मचारी यांनी आजपासून विद्यापीठ बंद आंदोलन पुकारलं होतं. सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जिवीत करण्यात यावी, सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. 24 सप्टेंबरपासून विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद सुरु केलं होतं. आजपासून त्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कालावधीसाठी विद्यापीठ बंद आंदोलन सुरु केलं होतं. विद्यापीठामधला कोणताही विभाग उघडला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेन बिल्डिंगच्यी आवारात बसून ठिय्या आंदोलन केलं.
राज्यातल्या अकृषी विद्यापीठांमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे आतापर्यंत 5 विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा पुढे ढकलत असल्याचं जाहीर केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षीच्या परिक्षा 1 ओक्टोबरला सुरु होणार होत्या. 29 सप्टेंबरला परिपत्रक काढून या दोन्ही विद्यापीठांनी परिक्षा पुढे ढकलत असल्याचं सांगतिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, या विद्यापीठांनीही ओक्टोबरमध्ये होणारी अंतिम वर्षाची परिक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं आहे.