मुंबई : राज्यात झपाट्याने वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी वीकेण्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे राज्यभर रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातही नगारिकांनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिला आहे. अनेक ठिकाणी कडेकोट लॉकडाऊन पाळला जात आहे, तर काही ठिकाणी लॉकडाऊनला विरोधही पाहायला मिळाला. 


रोज धावणारी मुंबई आज थांबलेली पाहायला मिळाली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना आज बंद ठेवण्यात आल्या.  लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेल नाहीत, त्यामुळे अजूनही बेस्टने नागरिक प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे मुंबई मेट्रोत शुकशुकाट पाहायला मिळाला. रोज हजारोंच्या संख्येने नागरिक मुंबई मेट्रोने प्रवास करतात. मात्र आज मेट्रो स्थानकांवर अगदी तुरळक प्रवासी दिसून येत आहेत. मात्र सकाळी दादर मार्केटमध्ये नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 


महाराष्ट्राला फक्त लसीच नाही तर महत्वाची वैद्यकीय उपकरणं देण्यात सुद्धा केंद्राकडून दुजाभाव : पृथ्वीराज चव्हाण


ठाण्यात रस्त्यांवर शुकशुकाट


ठाण्यातील सर्वाधिक वर्दळीचं ठिकाण जांभळी नाका येथील मार्केट परिसर आज कुणीही दिसत नव्हतं. ठाणे स्टेशन रोड परिसरात असलेले सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती आहेत. मुख्य भाजी मंडई, धान्य मार्केट देखील बंद आहे. पोलिसांनी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले आहेत. ठाण्यातील रस्त्यावर आज शुकशुकाट बघायला मिळत आहे. काही अपवाद वगळता ठाणेकरांनी वीकेण्ड लॉकडाऊन ला चांगला प्रतिसाद दिला आहे.


सिंधुदुर्गात सर्व आस्थापना बंद


सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व आस्थापना बंद ठेऊन नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी चौकचौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर तसेच कामाशिवाय घराबाहेर निघालेल्यांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्या प्रशासन आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हावासियांना घराबाहेर पडू नये, असं आवाहन केलं आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून वीकेण्ड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.


खासदार उदयनराजेंचं भीक मांगो आंदोलन, म्हणाले, मला भीक मागायची वेळ आलीय तर... 


वीकेंड लॉकडाऊनला उदयनराजेंचा भीक मांगो आंदोलन करत विरोध


वीकेंड लॉकडाऊनला विरोध दर्शवण्यासाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवई नाक्यावर झाडाखाली भीक मांगो आंदोलन केले. लॉकडाऊनमुळे दुकानदारांचे हाल होत आहेत, अनेकांच्या पोटाला अन्न नाही असे म्हणत उदयनराजेंनी हे आंदोलन केले. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावाधाव झाली. उदयनराजे यावेळी बसायला पोती आणि ताट घेऊन आले होते. या भीक मांगो आंदोलनात जमा झालेले पैसे त्यांनी जिल्हाधिकारी यांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाजातच अडवले. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांना खाली बोलावून घेतले. त्यानंतर उदयनराजेंनी ताटलीमध्ये जमा झालेले सर्व पैसे जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.


Pune Corona Vaccine : पुण्याला थेट केंद्राकडून लस! दावा फोल ठरल्यानंतर पुण्याच्या महापौरांचं विभागीय आयुक्तांकडे बोट


नांदेडमध्ये वीकेण्ड लॉकडाऊनचा फज्जा


नांदेड जिल्ह्यात या वीकण्ड लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. नांदेड जिल्ह्यातील बाजारपेठेत व रस्त्यावर नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य शासनाने घोषणा केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनचा नांदेडकरांनी फज्जा उडवल्याचं चित्र आहे.