सातारा : वीकेंड लॉकडाऊनला विरोध दर्शवण्यासाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवई नाक्यावर झाडाखाली भीक मांगो आंदोलन केले. लॉकडाऊनमुळे दुकानदारांचे हाल होत आहेत, अनेकांच्या पोटाला अन्न नाही असे म्हणत उदयनराजेंनी हे आंदोलन केले. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावाधाव झाली. उदयनराजे यावेळी बसायला पोती आणि ताट घेऊन आले होते. या भीक मांगो आंदोलनात जमा झालेले पैसे त्यांनी जिल्हाधिकारी यांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाजातच अडवले. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांना खाली बोलावून घेतले. त्यानंतर उदयनराजेंनी ताटलीमध्ये जमा झालेले सर्व पैसे जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, मला भीक मागायची वेळ आली असेल तर गोरगरीबांची काय अवस्था असेल. सरकारमध्ये इच्छाशक्ती नसेल तर काय करणार. राजेशाही असती तर ही अवस्था आली नसती. लसीकरण केलेल्यांना कोरोना होत आहे. या बाजार बुनग्यांनी बाजार मांडलाय, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.
ते म्हणाले की, आपण टॅक्स भरतो तेव्हा हे आयजी, कलेक्टर यांचे पगार होतात. काय विचार न करता लॉकडाऊन करता. ही तुमच्या बापाची इस्टेट आहे का? अशा शब्दात त्यांनी सवाल केला. लस देऊ शकत नाहीत आणि वरुन पैसे खाता. एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रकरणात एवढे पैसे खाता, लोकांनीही विचार केला पाहिजे. राजेशाही असती तर मी या सर्वांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते, असं उदयनराजे म्हणाले.
ते म्हणाले की, एक जगला पाहिजेत, लाख मेलेतरी चालतील असे यांचे धोरण आहे. मी म्हणतो एक मेला तरी चालेल लाख वाचले पाहिजेत. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हा प्रश्न मिटवावा आणि व्हॅक्सिन द्यावे.
कलेक्टर आणि जिल्हा प्रशासन स्वत:ला खूप शहाणे समजतायत, यांना स्वत:ची बुद्धी दिली आहे की नाही. माझ्या ताब्यात द्या मी सर्व व्यवस्थित करतो. एका पोलिसांनी जर कोणाला काठी मारली तर संपूर्ण महाराष्ट्रात लॉयन ऑर्डर निर्माण होईल. पोलिसांचा आपण आदर करतो म्हणून काय त्यांनी काहीही करावं का, मानला तर देव नाहीतर दगड. हजार लोकांनी एका पोलिसाला चोपलं तर त्याची हाडं तरी दिसतील का? पोलिसांनी मारलं तर सोडू नका मी तर सोडणार नाही, असंही खासदार उदयनराजे म्हणाले.