काँग्रेसने जे करुन ठेवलंय ते विकायचं काम बंद करा...., भास्कर जाधवांनी केली मोदींची मिमिक्री
काँग्रेसने जे करुन ठेवलंय ते विकायचं काम बंद करा आणि तुम्ही काहीतरी करा असं आता नागरिक पंतप्रधान मोदींना सांगत असल्याचं शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैलीची नक्कल आतापर्यंत अनेकांनी केली आहे. त्यामध्ये राज ठाकरे, लालू प्रसाद यादव, छगन भुजबळ यांच्यासह शाम रंगिला यांनीही पंतप्रधान मोदींची नक्कल करुन त्यांची खिल्ली उडवली आहे. आता त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची नक्कल करताना त्यांच्यावर टीका केली.
भास्कर जाधव मोदींच्या शैलीत बोलताना म्हणाले की, "कॉंग्रेसने आतापर्यंत काहीच केलं नसल्याचं मोदी लोकांना सांगत होते. पण लोकांची आता भावना बदलली आहे. कॉंग्रेसने गेल्या 70 वर्षांच्या काळात जे काही करुन ठेवलंय ते विकायचं बंद करा आणि तुम्ही काहीतरी करा."
सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना सांगायचे की गेल्या 70 वर्षांच्या काळात कॉंग्रेसने काहीच केलं नाही. लोकांनाही ते खरं वाटायचं. पण आता लोकांचीही भावना बदलली आहे असं भास्कर जाधव म्हणाले.
शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले की, "मोदींनी उज्ज्वला गॅस योजना आणली, सुरुवातीला देशातल्या नागरिकांना फुकटात गॅस वाटल्याचं सांगितलं. पण आता गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवून ठेवल्या आहेत. त्यावेली मी नागरिकांना सातत्याने सांगत होतो की मोदी सरकार गॅस फुकट देत नाही. ते तुमचा विश्वासघात करणार आहेत, लवकरच अनुदान बंद करतील. आता तेच केलं आहे."
भास्कर जाधव यांनी केलेली ही मिमिक्री चांगलीच व्हायरल होत आहे. या आधीही अनेक राजकारण्यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली आहे. आता भास्कर जाधवांच्या या मिमिक्रीनंतर लोकांनीच ठरवावं की मोदींची नक्कल कोण चांगली करतंय ते.
महत्वाच्या बातम्या :
- 'आज बाळासाहेबांमुळे मोदींचं अस्तित्व, नाहीतर ते केव्हाच संपलं असतं'; शिवसेना नेत्याकडून थेट पंतप्रधान लक्ष्य
- कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोविड टेस्ट सक्तीची की नाही? नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यामुळे संभ्रम
- Farmers Protest : शेतकऱ्यांची 28 तारखेला मुंबईत महापंचायत तर 29 तारखेला संसदेला घेराव, आंदोलनाला एक वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नियोजन