SSC Paper Leak : मागील काही दिवसांपासून दहावी-बारावीचं (SSC paper leak) पेपरफुटी प्रकरण चांगलंच गाजत आहेत. आता त्यात पुण्यातील एक केंद्रची भर पडली आहे. पुण्यात दहावीच्या गणित भाग एकचा पेपर महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईल फोनमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दहावीच्या परीक्षा केंद्रावर परवानगी नसतानाही हॉलमधील फोटो काढल्याने सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेपरफुटीची प्रकरणं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गाजली मात्र पुण्यातील अनेक शाळांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरळीतपणे दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु होती. परंतु बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील सुरक्षरक्षकाच्या फोनमध्ये पेपर आढळला. 13 मार्चला गणित भाग एकचा पेपर होता यावेळी विद्यालयातील सुरक्षारक्षक असलेल्या मनीषा कांबळे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले. 15 मार्चला बोर्डाचे पथक तपासणीसाठी विद्यालयात गेले असता आरोपी महिलेवर पथकाचा संशय आला. यावेळी तिच्या मोबाईल फोनची झाडाझडती घेतली असता गणित भाग एक प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याचं समोर आलं. यावेळी पथकाने तातडीने संबधित महिलेकडे चौकशी केली मात्र उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अखेर पथकाकडून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगरमध्ये पाच जणांना अटक
बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी अहमदनगरच्या मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली. मुंबई क्राईम ब्रान्चने ही कारवाई केली. क्राईम ब्रान्चच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3 मार्चला बारावी गणिताचा पेपर महाविद्यालयातील विद्यार्थांना एक तास आधीच मिळाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या महाविद्यालयात 337 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 119 विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे महाविद्यालयातच आले होते. शाळेचा निकाल 100 टक्के लागावा या उद्देशाने शाळेच्या व्यवस्थापनाने पेपर फोडला. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10 हजार रुपये घेतल्याचे समोर आलं आहे.
बुलढाण्यातही आरोपी अटकेत
दुसरीकडे बुलढाण्यातील बारावी गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाईंड SIT ने शोधला आहे. लोणार येथील खाजगी शाळेतील शिक्षक असलेला अकील मुनाफ हाच पेपरफुटीचा मुख्य आरोपी असल्याची माहिती एसआयटीच्या सुत्रांनी दिली आहे. अकील मुनाफ याने गणिताचा पेपर सुरु होण्याआधी आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेरात पेपरचे फोटो काढून इतरांना पाठवले. दरम्यान अकील मुनाफ सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.