Chandrapur News : सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी (Paromita Goswami) यांच्या संपदा अर्बन निधी लिमिटेड या बचत बँकेला अनधिकृत घोषित करण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. चंद्रपूरच्या (Chandrapur News) आर्थिक गुन्हे शाखेने एक पत्र काढून गोस्वामी यांच्या बचत बँकेसह आणखी दोन बँकांना अनधिकृत घोषित केले आहे. केंद्रीय कार्पोरेट मंत्रालयाने विशिष्ट एनडीएच 4 प्रमाणपत्र नसण्यावरुन ही बँक अनधिकृत असल्याची घोषणा केली आहे. या बँकेत यापुढे कुणीही सदस्यत्व घेऊ नये असे EOW ने म्हटलं आहे. तर दुसरीकडे आपल्या एनडीएच 4 प्रमाणपत्राची प्रक्रिया प्रलंबित असून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र मिळणार असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने केलेली घोषणा अन्यायकारक असल्याचं मत गोस्वामींचं आहे. त्यामुळे एनडीएच 4 च्या प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन गोस्वामी आणि चंद्रपूर पोलीस समोरासमोर उभे ठाकले आहेत. 


थेट वर्तमानपत्रात बँकांची नावं जाहीर करण्यावर पारोमिता गोस्वामी यांचा आक्षेप


चंद्रपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन संपदा अर्बन निधीसह आणखी दोन बँकांमध्ये सभासदत्व घेऊ नका आणि कुठलाही व्यवहार करु नका असा इशारा दिला आहे. या पत्रामुळे आपल्या बँक खातेधारक आणि विशेषतः महिला बचत गट तसंच छोट्या उद्योजकांमध्ये संभ्रम पसरला असून अॅड. गोस्वामी यांनी यासंदर्भात कार्पोरेट मंत्रालयाच्या थेट वर्तमानपत्रात बँकांची नावे जाहीर करण्यासंदर्भात आक्षेप घेतला आहे. एनडीएच-4 हे विशिष्ट प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपली प्रक्रिया सुरु असून त्या आधीच मंत्रालयाने पोलिसांमार्फत अशा पद्धतीने माहिती जाहीर करणे अन्यायकारक असल्याचे त्या म्हणाल्या. बँकेची स्थिती उत्तम असून व्यवहार सामान्य असल्याचे गोस्वामी यांनी स्पष्ट केले.


केंद्रीय कॉर्पोरेट मंत्रालयाकडून एनडीएच-4 प्रमाणपत्र नसलेल्या बचत बँकांची यादी जाहीर


दुसरीकडे केंद्रीय कॉर्पोरेट मंत्रालयाने एनडीएच-4 प्रमाणपत्र नसलेल्या बचत बँकांची यादी जाहीर करत सामान्य नागरिक आणि खातेदारांना या बँकांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. ही सूचना आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कर्तव्य पार पाडल्याचे चंद्रपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले. एनडीएच-4 प्रमाणपत्र संदर्भात या बँकांनी निकष पूर्ण केले नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.


पारोमिता गोस्वामी आणि चंद्रपूर पोलीस आमनेसामने


चंद्रपूर जिल्ह्यात गेली काही वर्षे बचत बँका आणि अर्बन निधी या माध्यमातून मोठ्या संख्येत छोट्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. पोलीस यंत्रणा आपल्या माध्यमातून सातत्याने अशा संभ्रम असलेल्या बँक आणि अर्बन निधी बाबत जनजागृती करत असतात. मात्र एनडीएच-4 च्या मुद्द्यावरुन सध्या अॅड. गोस्वामी आणि चंद्रपूर पोलीस समोरासमोर उभे ठाकल्याने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पारोमिता गोस्वामी या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या असून दारूबंदी, नक्षलग्रस्त भागातील लोकांचे मानवाधिकार, आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळवून देने, रोजगार हमी योजनेतला भ्रष्टाचार, बालमजुरांना वेठबिगारीतून मुक्त करणे या सारख्या विषयांवर काम केलं आहे.