Raigad News रायगड : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पिंपळोली नागाव हे गाव प्रामुख्याने सैनिकांचं गाव म्हणून ओळखले जातं. मात्र देशवासीयांची सेवा करणारे हे सैनिकांचं गाव आता असुरक्षित झाल्याचे चित्रं समोरं आले आहे. याचे कारण येथील गावांना जोडणारा, वाहतूक आणि रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा नदीवरील पूल अतीशय जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आला आहे. परिणामी, अखेरची घटका मोजणारा हा पुल (Raigad News) कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती येथील गावकरी व्यक्त करताय. पुलाचे मुख्य संरक्षक कठडे नदीत  तुटून पडल्याने प्रवासादरम्यान एखादें वाहन या पुलावरुन घसरून नदीत कोसळण्याची भिती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 


ऐन पावसाळ्यात या पुलाला दहा फुटहून अधिक उंचीच्या पाण्याचा वेढा असतो आणि त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊन जवळजवळ 10 गावे आणि आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटतो. वारंवार लेखी पत्रव्यवहारद्वारे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून देखील स्थानिक शासन, प्रशासन आणि सरकार अद्याप कोणतेही सकारात्मक पाऊल उचलत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे . 


सैनिकांच्या गावाला न्याय कधी मिळणार?


रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील पिंपलोळी नागाव परिसरातील आदिवासी ठाकूर धनगर वाड्या यांच्यासाठी वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने हा पुल अतीशय महत्वपूर्ण मानला जातो. सभोवताली असणाऱ्या शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी याच पुलाचा वापर शाळकरी विद्यार्थी करतात. महापुरात हा  पुल पाण्याखाली गेल्यावर विद्यार्थ्यांचे वारंवार शैक्षणिक नुकसान होते. कामगार वर्गासाठी देखील पर्यायी वाहतूकीसाठी दुसरा मार्ग नसल्याने वाहतूक ठप्प पडते आणि मोठी रोजगाराची समस्या निर्माण होते. शिवाय रास्त भाव धान्याचे दुकान याच गावात असल्यानं सभोवतालच्या गावातील हजारों कुटुंबांना याचा मोठा फटका बसतो. परिणामी, वेळेत धान्य न मिळाल्याने अनेकांना उपासमारी सारख्या समस्येला या गावकऱ्यांना सामोरे जावे लागते. या गावाचा संपूर्ण कारभार सुधागड पाली या तालुक्याच्या ठिकाणी अवलंबून असल्याने प्रशासकीय कामकाज तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक महिलां व ग्रामस्थांना  देखील याचा मोठा फटका बसत आहे. 


सरकारने नवीन पुल बांधून देण्याची गावकऱ्यांची मागणी 


सर्व प्रशासकीय कार्यालये पाली सुधागड मध्ये असल्याने जनतेची कामे खोळंबतात. या विभागातील नागरिकांची संपूर्णतः मदार या पुलावर आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूला लागवडीखालील भातशेती क्षेत्र असल्याने पुराच्या वेळी शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. गावावर उभे राहिलेले हे संकट आता कधी टळणार? अशी अवस्था येथे या गावकऱ्यांची निर्माण झाली आहे. सरकारने लवकरात लवकर या पुलाला भरीव निधी देऊन या गावाला वर्षानुवर्षे भेडसावणारी पुलाची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. 


हे ही वाचा