Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज अहमदनगर (Ahmednagar) येथे शांतता रॅली होणार आहे. अहमदनगरच्या माळीवाडा बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पारंपरिक मिरवणुक मार्गावरुन ही शांतता रॅली काढली जाणार आहे. पुढे चौपाटी कारंजा येथे शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. त्याअनुषंगाने मराठा समाजाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 


मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची तयारी कशी?


अहमदनगर शहरात सर्वत्र भगवे झेंडे लावले आहेत. तसेच ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि प्लेक्स देखील लावण्यात आले आहेत. फटाकड्यांची आतिषबाजी होत आहे. 2500 प्रशिक्षित स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. तसेच या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर 'नो व्हेईकल झोन' तसेच पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था, ध्वनिक्षेपक, पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. 


पार्किंगची व्यवस्था कुठं करण्यात आली आहे?


न्यू आर्टस् कॉलेज 
क्लेराब्रूस हायस्कूल मैदान
फटाकडा मार्केट मैदान, कल्याण रोड 
मार्केट यार्ड 
मार्केट यार्ड समोरील फटाकडा मार्केट मैदान 
नेमाने इस्टेट, केडगाव 
गाडगीळ पटांगण 


मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीचा मार्ग कसा असणार?


केडगाव ग्रामस्थांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन, पुढे केडगाव येथील  छत्रपती  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर कायनेटिक चौक येथून दुपारी 1 वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. पुढे माळीवाडा बस स्थानक परिसरातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन पारंपरिक मिरवणूक मार्गाने चौपाटी कारंजा येथे रॅलीचे सांगता होणार आहे.


अहमदनगर शहरासह उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर


आता मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरासह उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रॅलीमुळे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आजच्या दिवसाची तासिका इतर दिवशी भरून काढवीत, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, सध्या मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आज अहमदनगर आणि उद्या नाशिकमध्ये जरांगे पाटील यांची शेवटची शांतता रॅली होणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील दौरा संपणार आहे. तर येत्या 29 ऑगस्टला जरांगे पाटील पुढचा निर्णय जाहीर करणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


Manoj Jarange Patil : पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंना भोवळ, उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल