Nagpur News नागपूर : राजकीय पक्षांमध्ये पोस्टर वॉर रंगताना आपण नेहमीच बघत असतो. मात्र, नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात एक वेगळेच पोस्टर युद्ध सुरू झाले आहे. भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करत 'फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या चरणी वाहिलेल्या 53 सेवा' अशा आशयाचे शेकडो पोस्टर्स लावण्यात आले आहे. त्यामध्ये किल्ले रायगडाचा पुनर्विकासासाठी निधी देणे, मुंबई बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, मुंबईतील कोस्टल रोड, जलयुक्त शिवार, गडचिरोली मधील स्टील उद्योग आणणे ,गृहमंत्री म्हणून नक्षलवाद्यांविरोधात भक्कम कारवाया करणे, आदिवासींना वन हक्क पट्टे तर शेतकऱ्यांना एक रुपयात पीक वीमा देणे, अशा अनेक कामांचा उल्लेख करण्यात आला आहे.


बॅनरच्या माध्यमातून भाजप-काँग्रेसमध्ये खडाजंगी  


तर दुसरीकडे काँग्रेसने ही मुंबईची बुलेट ट्रेन गुजरातच्या विकासासाठी केली, नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रो मधील स्थानिक तरुणांना नोकऱ्या देता का, जलयुक्त शिवार नव्हे जलयुक्त शहर बनवली, अशा आशयाचे पोस्टर्स लावून देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार वर टीका केली आहे. त्यामुळे राज्याच्या उपराजधानीत बॅनरच्या माध्यमातून भाजप-काँग्रेसमध्ये खडाजंगी रंगल्याचे बघायला मिळत आहे.    


विशेष म्हणजे काही ठिकाणी तर विरोधकांनी फडणवीसांच्या कामांचा उल्लेख करणारे पोस्टर्स ही फाडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची पोस्टरबाजी नागरिकांचे लक्ष तर वेधूनच घेत आहे. सोबतच आपलं म्हणणं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किती टोकाला जात आहेत, याचे एक वेगळे उदाहरण ही सध्या नागपुरात पाहायला मिळत आहे.


देवेंद्र फडणवीसांविरोधात लढवण्यासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची चढाओढ


एकीकडे देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात पोस्टर वॉर रंगलं असताना, नागपूर शहरातील सहा हि विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केलाय.  या मतदारसंघात निवडणूक पूर्व तयारीलाही सुरवात झाल्याचे काँग्रेसचे  शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे राज्याची उपराजधानी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात काँग्रेसने जोरदार मोर्चे बांधणी केल्याचे चित्र आहे. नागपूर शहरातील सहा हि विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत 71 इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेसकडे उमेदवारी मिळावी, यासाठी अर्ज केले आहे. यात सर्वाधिक अर्ज हे मध्य नागपूर विधानसभेसाठी 30 अर्ज आले असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी देखील काँग्रेस मध्ये इच्छुकांची मोठी यादी असल्याचे ही  विकास ठाकरे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या