सोलापूर: एबीपी माझाने पाठपुरावा केलेल्या एका बातमीनंतर मोठं यश मिळालं आहे. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा अखेर नामंजूर करण्यात आला. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी हा राजीनामा नामंजूर केला आहे. प्रशासकीय कारणामुळे डिसले यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येतं असल्याबाबत शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. या संदर्भात किरण लोहार यांची अधिकृत बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.


ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर दोन वर्ष गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यांसंदर्भात त्यांच्यावर चौकशी समिती देखील गठीत केली होती. या समितीच्या अहवालमध्ये देखील डिसले यांच्यावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले होते. यांनतर रणजितसिंह डिसले यांनी आपल्या सहशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. 8 ऑगस्ट पर्यंत डिसले यांना राजीनामा मागे घेण्याची संधी होती. मात्र डिसले यांनी आतापर्यंत आपला राजीनामा मागे घेतलेला नव्हता. 


रणजितसिंह डिसले यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने देखील त्यांच्यावर गंभीर आरोप केलेला होते. मात्र या अहवालातील निष्कर्ष चुकीचे असल्याचे माझाच्या पडताळणीत आढळले होते. माझाने या संदर्भात पाठपुरावा केला. त्यानंतर डिसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती.


डिसले यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानंतर डिसले राजीनामा मागे घेणार की त्यांचा राजीनामा नामंजूर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आज अखेर रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा प्रशासनानेच नामंजूर केला आहे.




 


महत्त्वाच्या बातम्या: